ठाणे ते पुणे आता ई-शिवनेरी धावणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-शिवनेरी बसचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसला हिरवार झेंडा दाखवण्यात आला आहे. ही ई-शिवनेरी बस ठाणे ते पुणे अशी धावणार आहे. या आठवड्याअखेर पर्यंत ८ बसेस ठाणे ते पुणे अशा धावतील. यात पुरूषांसाठी ५१५ रुपये आणि महिलांसाठी २७५ रुपये भाडे असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध उपक्रमांचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आली. दरम्यान, मुंबई– ठाणे- पुणे या मार्गावर इलेक्ट्रिकवरील १०० शिवनेरी बसेस धावणार आहेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा आहे. आज राज्यातील ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहोचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा देखील सुरु केली आहे. मुंबई– ठाणे- पुणे या मार्गावर इलेक्ट्रिकवरील १०० शिवनेरी बसेस धावणार आहेत.”