'ई-ऑफीस' प्रणालीमुळे फायलींना मिळणार वेग
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
नागरिकांनी एखादा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिल्यानंतर तो लवकर पुढे सरकत नाही. अनेकदा फाईलवर ‘वजन’ ठेवलेले नसेल किंवा अन्य काही कारण असेल पण 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी स्थिती निर्माण होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आता ई-ऑफिस प्रणाली राबवण्यास सुरुवात झाली असून, पोलिसांकडे येणारा प्रत्येक कागद ऑनलाईन माध्यमातून जतन करून ठेवला जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयातील कामे जलद गतीने व्हावीत, कामे प्रलंबित राहू नयेत, तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘ई ऑफिस’ ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार हा ऑनलाइन चालणार असून, ई-ऑफिस प्रणाली राबविणारे पिंपरी-चिंचवड पोलीस दल हे राज्यातील तिसरे दल ठरले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे आयआयटी कानपूर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तंत्रज्ञान क्षेत्रातील असल्याने या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला आहे. पोलिसांचे सक्षमीकरण करून पोलिसांचा कारभार हा तंत्रज्ञानपूरक करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
पोलिसांच्या कामाचा वेळ वाचवण्यासाठी तसेच सर्व कामे जलद गतीने होण्यासाठी आयुक्तांनी ई-ऑफिस ही संकल्पना सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ बनवण्यात आले आहे. त्याचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पुरवण्यात आले आहेत. संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या नावावर किती कामे प्रलंबित आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळणार आहे. यासाठी एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नावाने आलेले टपाल पोलीस आयुक्त कार्यालयातील बिनतारी विभागात येते. तिथून संबंधित पोलीस ठाण्यांना ते टपाल पाठवले जाते. मात्र आता नव्या प्रणालीनुसार हे टपाल संबंधित पोलीस ठाण्यांना ऑनलाईन माध्यमातून पाठवले जाणार आहे. पुढील काही दिवस सॉफ्ट कॉपीसह हार्ड कॉपी देखील पोलीस ठाण्यात पाठवल्या जातील. काही दिवसानंतर हार्ड कॉपी न पाठवता केवळ सॉफ्ट कॉपी पाठवल्या जाणार आहेत. नागरिकांचे तक्रार अर्ज आणि इतर कागदपत्रे देखील ऑनलाइन माध्यमातून पोलीस स्टेशन आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली जाणार आहेत. ई-ऑफिस ही संकल्पना सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू करण्यात आली. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात ई-ऑफिस यंत्रणा राबवण्यात आली. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
नागरिक आपल्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे अर्जाच्या माध्यमातून मांडतात. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून त्या अर्जांची दखल घेऊन संबंधित पोलीस स्टेशन अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते अर्ज पाठवले जातात. मात्र हे अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागल्याचे प्रकार पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी ई- ऑफिस या यंत्रणेचा भरपूर उपयोग होणार आहे. नागरिकांनी अर्ज दिल्यानंतर तो स्कॅन करून ई-ऑफिस प्रणालीमध्ये टाकला जाईल. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या परवानगीने संबंधित अधिकाऱ्यांकडे तो पाठवला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया कमी कालावधीत होईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.