वडेट्टीवारांच्या पुणे दौऱ्यात धंगेकर-शिंदे नाराजीनाट्य!
सीविक मिरर ब्यूरो
नुकतीच विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले असता रविवारी (दि. ६) त्यांच्या समोरच शहर काॅंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवारांच्या पुणे दौऱ्यापेक्षा आमदार रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नाराजीनाट्याचीच चर्चा जास्त झाली.
विजय वडेट्टीवार यांची नुकतीच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहरातील काँग्रेसमधील गटबाजीचा अनुभव आला. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे या निमित्ताने प्रकर्षाने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील नाराजी चुकीच्या रितीने आणि चुकीच्या वेळी समोर आल्याची प्रतिक्रिया काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून येत आहे. त्यांच्या या दौऱ्यातील नाराजीनाट्याची चर्चा काॅंग्रेससोबतच इतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही रंगली होती.
विजय वडेट्टीवार पुण्यात येताच काँग्रेसमधील नाराजीनाट्याचा पहिला प्रयोग सुरू झाला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार वडेट्टीवार हे पुणे काँग्रेस कार्यालयात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे वडेट्टीवार यांच्यासोबतच गाडीमधून प्रवास करीत होते. वडेट्टीवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे ते नाराज झाले. ते वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले अन् थेट काँग्रेस कार्यालयात आले. या निमित्ताने वडेट्टीवार यांच्यासमोर धंगेकर गट आणि शहराध्यक्ष शिंदे गटातील धूसफूस समोर आली. या घटनेमुळे पुणे कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
अजित पवार यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांची फिरकी घेतली. ‘‘अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, हे अजित पवार यांना पाच वर्षांपूर्वी माहीत नव्हते का? आता अजित पवार यांना हा जावईशोध कसा लागला? अजित पवार सत्तेला सर्वोच्च मानतात. परंतु सत्तेला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना जनता बुडवल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी टीका वड्डेटीवार यांनी काॅंग्रेस भवनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केली. तत्पूर्वी, कसबा मतदार संघाच्या वतीने विजय वडेट्टीवार यांचा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे,
गजानन थरकुडे, विशाल धनवडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर माझा पहिला सत्कार पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात होत आहे. छत्रपती शिवरायांचे बालपण येथील लाल महालात गेले. आई जिजाऊंचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी जबाबदारी मला सोपवली, ती मी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राहुल गांधी यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा कट भारतीय जनता पक्षाने रचला होता. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी सर्व जाती-धर्मांना एकत्र करून देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांच्या यात्रेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. अन्यायाविरुद्ध लढणे ही काँग्रेसची परंपरा आहे. ही परंपरा घेऊन मी राज्याच्या जनतेच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव काम करत राहणार आहे.’’