गाडीचा धक्का लागल्याने वाद, तरुणाने महिलेच्या कानशिलात लगावली
देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतो. अत्याचाराच्या घटना नेहमीची आपल्याला दिसून येतात. आता अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका सोसायटीत गाडी पार्क करताना समोरच्या घराच्या गेटला धक्का लागल्याने एका महिलेला शिवीगाळ करत शेजाऱ्याने थेट कानशिलात लागवली आहे.
कोंढवा परिसरातील साळुंके विहार रस्त्यावरील सोसायटीत एक महिला रात्रीच्यावेळी आपली गाडी पार्क करत होती. यावेळी चुकून समोरच्या घराच्या गेटला या महिलेच्या गाडीचा धक्का लागला. याच शुल्लक कारणावरून समोरच्या घरातील एका व्यक्तीने महिलेशी हुज्जर घालायला सुरूवात केली. मात्र, दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची दरम्यान या व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करायला सुरूवात केली.
त्यानंतर संबंधित महिलेने या व्यक्तीची माफी मागितली. मात्र, या व्यक्तीने महिलेच्या थेट कानशिलात लगावून तिला जमिनीवर आपटले. तसेच "माझे कोणीही वाकड नाही करू शकत नाही", असे बोलून तो तिथून निघून गेला.
त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र, अवघ्या २४ तासांत हा व्यक्ती जामिनावर बाहेर आला आहे. त्यामुळे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मारहाण करून अटकेत असलेला व्यक्ती २४ तासात बाहेर येत असेल तर माझ्या सुरक्षेच काय? माझ्यावर हा व्यक्ती पुन्हा हल्ला करणार नाही का? असे सवाल आता ही महिला करत आहे.