कालव्यातील प्रदूषित पाण्यामुळे दीड लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात
यशपाल सोनकांबळे
मुठा नदीवरील उजव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील १० ग्रामपंचायतींमधील सुमारे दीड लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या उजव्या कालव्याचे पाणी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी दिले जाते तसेच सिंचनासाठी वापरण्यात येते.
खडकवासला ते इंदापूर दरम्यान १४० किलोमीटर लांबीच्या या कालव्यात पुण्यातील सांडपाणी सोडले जाते. अनेक औद्योगिक प्रकल्पातील दूषित पाणी त्यावर प्रक्रिया न करताच कालव्यात सोडले जाते. शहरात साचलेला कचराही या कालव्यात टाकण्यात येतो. त्यामुळे कालव्यातील पाण्याचे प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.
याशिवाय बेकायदेशीरपणे पाणी काढण्यासाठी कालव्याच्या भिंतींना तडे गेले आहेत. शिवाय, कालवा अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आल्याने भिंतींना भेगा पडल्या असून त्यामुळे अनेकदा पाण्याची गळती होते. पाणी गळतीचा मुद्दा निदर्शनास आल्यावर २७ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाने काही ठिकाणी डागडुजी केल्यामुळे काही ठिकाणची पाणी गळती थांबली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका ठिकाणी कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले होते. पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणाऱ्या दुरुस्तीने पाणीगळती तात्पुरती थांबते. मात्र पाणी गळतीची समस्या या वरवरच्या डागडुजीमुळे सुटणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुठा नदीवरील उजव्या कालव्यातील दूषित पाण्यामुळे या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणाऱ्या नागरिकांवर दुष्परिणाम होत आहे. दौंड नगरपालिका हद्दीतील १० ग्रामपंचायतीत याच कालव्यातून पिण्याचे पाणी दिले जाते. दौंड नगरपालिकेतील रहिवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. या संदर्भात 'सीविक मिरर'शी बोलताना आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कालव्यातील प्रदूषित पाण्यामुळे दीड लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही पाटबंधारे विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. पुण्यातून येणारा हा कालवा तेथल्या झोपडपट्ट्यांसह अनेक निवासी परिसरासाठी सांडपाणी सोडण्याची जागा ठरली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही कुल यांनी म्हटले आहे.
या संदर्भात सीविक मिररशी बोलताना खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले की, विभागाकडून कालव्याची नियमित तपासणी व देखभाल केली जाते. कालव्याच्या भिंतीमध्ये भेगा पडल्यामुळे गळती होते. विभाग नियमितपणे गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती करत असतो.
त्यासाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागच्या काही वर्षांपासून कालव्यातील पाण्यात सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पाटील यांनी मान्य केले. कालव्यातून सुमारे ४० टक्के पाणी गळती होत असल्याचे सांगताना त्याचा फटका दौंड आणि इंदापूरवासियांना बसत असल्याचेही त्यांनी कबूल केले. याखेरीज आम्ही काठावरील अतिक्रमण हटवण्याचे काम करत आहोत. कालव्यात कचरा आणि सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेची असून आम्ही त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले असल्याचेही पाटील यांनी नमूद केले आहे.
पुणे शहरातून इंदापूरपर्यंत येणाऱ्या कालव्यात नागरी वस्त्यांतून सांडपाणी सोडण्यात येते. याखेरीज पुण्यातील औद्योगिक प्रकल्पातील रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने पाण्यातील प्रदूषित घटकांचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी दिले जाते. त्यामुळे अशा रसायनयुक्त पाण्यावर पिकवलेल्या फळभाज्या आहारात जात असल्यानेही आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान सीविक मिररने पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.