Pimple Saudagar road : बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे १५ फूट रस्ता खचला

शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या पिंपळे सौदागर भागातील १५ फूट रस्ता बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने गुरुवारी (२० जुलै) खचला. चारही बाजुंनी लोकवस्ती आणि चार शाळांचा परिसर असलेल्या ऐन रहदारीचा हा मोठा रस्ता सकाळी सव्वा सातच्या सुमारास खचल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 20 Jul 2023
  • 10:59 pm
बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे १५ फूट रस्ता खचला

बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे १५ फूट रस्ता खचला

पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रस्त्यावरील घटना, बांधकाम व्यावसायिकाला वाचवण्यासाठी महापालिकेची धावाधाव

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या पिंपळे सौदागर भागातील १५ फूट रस्ता बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न करता तसेच निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने गुरुवारी (२० जुलै) खचला. चारही बाजुंनी लोकवस्ती आणि चार शाळांचा परिसर असलेल्या ऐन रहदारीचा हा मोठा रस्ता सकाळी सव्वा सातच्या सुमारास खचल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

शहरातील बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांच्या कुणाल आयकॉन रस्त्यावरील बांधकाम साइटला लागून असलेला रस्ता गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास अचानक खचला. रस्त्यालाच लागून असलेल्या बांधकाम साईटसाठी निकृष्ट दर्जाचे पायलिंग केल्याने ही जमीन खचल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे. परंतु, केवळ रस्ता दुरूस्त करून देण्यापलिकडे महापालिकेने बांधकाम व्यावसायिकावर कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही.

परिसरातील स्कूलबस येथेच दररोज थांबत असतात. सकाळी बस निघून जाताच अवघ्या काही मिनिटात ही घटना घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सकाळी ही घटना घडल्यानंतर महापालिका अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत यात महापालिकेचीच कशी चूक आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवत बांधकाम व्यावसायिकाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

इमारतीच्या नऊ हजार चौरस फूट बांधकामासाठी येथे मोठा खोल खड्डा खणण्यात आला आहे. त्याच्या चारही बाजूंनी पायलींग करण्यात आले आहे. मात्र, हे पायलिंग अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकाने इमारतीसाठी आपल्याच जागेत खड्डा घेतला असला तरी हा खड्डा रस्त्याच्या सीमेला लागून घेतला आहे.  इमारतीच्या दोन मजली तळमजल्यावरील पार्किंगसाठीचा हा खड्डा असल्याने प्रचंड खोल आहे.

रस्ता खचून वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच महापलिकचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी रस्त्यावर एका बाजूने बॅरीकेडस  लावले. दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवली. त्यानंतर तातडीने बांधकाम व्यावसायिक तसेच त्यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

महापालिकेचा काही आदेश यायच्या आतच बांधकाम व्यावसायिकाने वाहून गेलेल्या रस्त्याच्या जागी भराव टाकण्याचे काम सुरू केले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तेथील वाहतूक कोंडी सोडवली. पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर कुंजीर निवाससमोर ही दुर्घटना घडली आहे. या परिसरात चार मोठ्या शाळा आहेत. या शाळांकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. सकाळी साडे सहा वाजल्यापासूनच या रस्त्यावरून स्कूल बस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन ये जा करत असतात. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाजूने पत्र्याचे कंपाऊंड मारले आहे. त्यामुळे येथे या बस थांबतात. आज नुकतीच तेथून एक स्कूलबस पुढे गेली आणि पुढच्या काही वेळाने रस्ता खचला. त्यामुळे स्कूल बस अजून काही मिनिटे या ठिकाणी थांबली असती तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. ज्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

रस्ता खचल्यानंतर तो तातडीने तयार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने जोरात तयारी केली. तातडीने जेसीबी, क्रेन, डंपरच्या साहाय्याने खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू केले. एका बाजूने वाहतूक सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला हे काम सुरू होते. काम सुरू करताना वाहतूक नियोजनासाठी एकही पोलीस किंवा महापालिकेचा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता.

रस्ता खचल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे महापालिकेचे काही अधिकारी आणि स्थानिक राजकीय पुढारी उपस्थित होते. महापालिकेची पाण्याची पाइपलाइन गळत असल्याने आणि तेथे काळी माती असल्याने रस्ता खचला. महापालिकेने लीकेज काढले नव्हते, असे या ठिकाणी नागरिकांना सांगण्यात आले. हे सांगण्यात काही महापालिका कर्मचारी, अधिकारी आघाडीवर होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली. आमच्या डोळ्यादेखत रस्ता खचून खाली इमारतीच्या खड्ड्यात वाहून गेला.  रस्ता खचायच्या काही मिनिटे आधी तेथून तीन स्कूल बस गेल्या होत्या. दररोज येथे अनेक स्कूल बस येत असतात. त्याचबरोबर परिसरातील शेकडो नागरिक मॉर्निग वॉकसाठी येथूनच जातात. त्यामुळे महापालिकेने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज येथील अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story