प्रेमी युगुलामुळे दोन देशांच्या यंत्रणा कामाला

अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे भारत आणि नेपाळ या दोन देशातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पुरती पळापळ झाली. अखेर दोन्ही देशांच्या दूतावासाने एकमेकांशी संपर्क साधत १४ वर्षीय मुलीला पिंपरी-चिंचवडमधून नेपाळला पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नेहा आणि नकुल (नावे बदलली आहेत) दोघे मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. नेहा १४ वर्षांची तर नकुल १९ वर्षांचा असून, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. दोघांनी लग्न करण्याचे ठरवून तीन दिवसांचा बस प्रवास करीत पिंपरी-चिंचवड गाठले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:52 pm
प्रेमी युगुलामुळे दोन देशांच्या यंत्रणा कामाला

प्रेमी युगुलामुळे दोन देशांच्या यंत्रणा कामाला

नेपाळच्या अल्पवयीन मुला-मुलीने गाठले पिंपरी-चिंचवड; वडिलांच्या तक्रारीवरून मुलीची घरवापसी

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणामुळे भारत आणि नेपाळ या दोन देशातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पुरती पळापळ झाली. अखेर दोन्ही देशांच्या दूतावासाने एकमेकांशी संपर्क साधत १४ वर्षीय मुलीला पिंपरी-चिंचवडमधून नेपाळला पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नेहा आणि नकुल (नावे बदलली आहेत) दोघे मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. नेहा १४ वर्षांची तर नकुल १९ वर्षांचा असून, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. दोघांनी लग्न करण्याचे ठरवून तीन दिवसांचा बस प्रवास करीत पिंपरी-चिंचवड गाठले.

नकुल याची बहीण पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर परिसरात राहते. त्यामुळे नकुल नेहाला घेऊन तिच्या घरी आला. मात्र, नेपाळमध्ये नेहाच्या वडिलांनी राहत्या घरातून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे दिली. त्यानंतर नेहाचा शोध स्थानिक पातळीवर सुरू झाला. परंतु, ती सापडली नाही. दरम्यान, घरापासून काही अंतर जवळच असलेल्या भागातील नकुल हा देखील नेहा ज्या दिवशी बेपत्ता झाली तेव्हापासून बेपत्ता असल्याचे उघड झाले.

नेहा आणि नकुल हे एकमेकांना ओळखत असून, अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती नेहाच्या वडिलांना स्थानिक नातेवाईकांनी दिली. त्यामुळे नेहाचे वडील स्थानिक पोलिसांकडे गेले. तेव्हा तिथे नकुल बेपत्ता झाल्याची नोंद नसल्याचे उघड झाले. त्यामुळे नकुल हाच नेहाला घेऊन गेला असावा, अशी अतिरिक्त माहिती नेहाच्या बेपत्ता होण्याच्या मिसिंग कंप्लेंटमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर बराच कालावधी गेल्यावर नकुल भारतात  असल्याची माहिती नेहाच्या कुटुंबीयांना समजली. भारतातून मुलीला परत आणून द्या, असा घोषा तिच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांकडे लावला होता. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असून, ती आमच्या हातात नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही नेहाच्या वडिलांचा पाठपुरावा सुरूच राहिला. त्यावर स्थानिक पोलिसांनी नेहाच्या वडिलांना दूतावासात जाण्याची सूचना केली.  त्यानंतर नेहाच्या वडिलांनी एका नातेवाईकाला घेऊन नेपाळमधील भारताचे दूतावास कार्यालय गाठले. नेपाळमधील भारतीय दूतावास आणि भारतातील नेपाळच्या दूतावासाशी समन्वय साधत नकुल, नेहा हे प्रेमीयुगुल भारतात नेमके कुठे आहेत याचा शोध घेण्यात आला.

दिल्लीस्थित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखांशी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस प्रमुखांशी संवाद साधत नेहाच्या शोधाबाबत चर्चा केली. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक रुपाली बोबडे आणि फौजदार वर्षा कादबाने यांनी नकुल याच्या बहिणीच्या घरी मोहननगर येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून प्राथमिक चौकशी झाल्यावर महिला बाल विकास विभागासमोर दोघांना हजर केल्यानंतर पुन्हा दोघांची चौकशी करण्यात आली.

तेव्हा नकुलने मला पळवून आणले नसून, मी स्वतः त्याच्याबरोबर भारतात आल्याची माहिती नेहाने दिली. तसेच आम्हाला लग्न करायचे असल्याचेही तिने अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, भारतात लग्न करण्यासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ असणे कायद्याने बंधनकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर नेहा परत मूळघरी नेपाळ येथे जाण्यास तयार झाली. त्याचबरोबर नकुलचे वय देखील १८ पेक्षा कमी नाही, याची खात्री अधिकाऱ्यांनी केली असून, नेहा नेपाळ येथे परत जाईपर्यंत त्याला दररोज पिंपरी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. नेपाळ येथील एका सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नेहाला परत नेण्यासाठी येत्या काही दिवसात भारतात दाखल होत असून, तिला त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. तोपर्यंत तिला निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे.

दोघांची ओळख आणि प्रेमसंबंधांमुळे मात्र, दोन देशातील यंत्रणा चांगलीच कामाला लागली असून, नेपाळमधील कायद्यातील तरतुदी आणि दोघे मूळचे भारतीय नसल्याने अन्य कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पिंपरी-चिंचवड पोलिसांना करता आलेली नाही. १८ वर्ष वयापेक्षा कमी वयाची मुले बेपत्ता झाल्यास भारतात अपहरणाचा गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध घेतला जातो. तसेच अल्पवयीन मुले स्वतःहून जरी अशा पद्धतीने लग्न करण्यासाठी तयार असल्यास देखील त्याला भारतात मान्यता देता येत नाही. परंतु, दोघेही नेपाळचे असल्याने त्यांना मायदेशी धाडण्यापलीकडे पोलिसांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story