वैकुंठातील प्रदूषण रोखण्यासाठी आता ड्राय स्क्रबरचा वापर
सीविक मिरर ब्यूरो
नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी ड्राय स्क्रबरची उभारणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी वैकुंठ स्मशानभूमीतील समस्या सोडवण्यासाठी बैठक घेऊन पुणे महापालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.
वैकुंठ स्मशानभूमीतील धुराचा आजूबाजूच्या सोसायट्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनास सूचना दिल्या. वैकुंठ स्मशानभूमीतील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी लाकडावरील शवदहन कमी करावे आणि त्याऐवजी विद्युत आणि गॅस दाहिनीची उभारणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
‘‘पुणे महापालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा अशा एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत,’’ अशी माहिती डॉ. खेमणार यांनी दिली. नागरिकांनी विकेंद्रित स्वरूपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठप्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. त्या दृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
नीरी आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.