अमली पदार्थ विक्री करणारे जेरबंद
#पुणे
शहरात गांजा, अफू अशा अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. या दोघांकडून अफू, गांजा असे तीन लाख २२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. हडपसर आणि भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. वीरमाराम बिश्नोई (वय ३०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पथक भारती विद्यापीठ भागात गस्त घालत होते. यावेळी भारती विहार सोसायटी परिसरात एकजण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वीरमाराम बिश्नोईला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपयांची १५० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात मांजरी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून १२ हजार रुपयांचा ६३२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी महिलेविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रवीण उत्तेकर, संदीप शिर्के, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.
कोयत्याची पूजा
दरम्यान, कोयत्याची मंदिरामध्ये पूजा करून त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील दोन युवकांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित महादेव हरिहर (वय २८) व सिद्धेश्वर संतोष वेताळ (वय १९, रा. आलेगाव पागा) यांनी शनिवारी (ता. २२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जाऊन त्याची पूजा केली. तसेच त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून गावामध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी कोयता जवळ बाळगल्याचे आढळून आले.
feedback@civicmirror.in