ड्युटी दिली जात नसल्याच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी बसचालकाची आत्महत्या
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) ठेकेदाराच्या बस संचालन करणाऱ्या व्यवस्थापकांकडून काम दिले जात नसल्याने त्रासाला कंटाळून कंत्राटी बसचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विलास बुळे असे आत्महत्या केलेल्या कंत्राटी बसचालकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी बुळे यांनी ११२ वर पोलिसांना फोन करत अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. फोन येताच पोलिसांनी बुळे यांच्या घरी धाव घेतली; पण तोपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. ही घटना खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. २१) रात्री दहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी बुळे यांच्या २८ वर्षीय पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश सावंत, अण्णा सावंत आणि परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती हे भोसरी डेपोतील पीएमपीएमल बसवर कंत्राटी चालक होते. मागील आठ महिन्यांपासून ते नोकरी करत होते. नोकरी लागल्यापासून ठेकेदाराच्या बस संचालन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बुळे यांना ड्युटी दिली जात नव्हती.
त्यामुळे पगार कमी मिळत होता. बुळे हे ड्युटी लावण्याबाबत वारंवार विनंती करत होते; पण अधिकाऱ्यांकडून
गटबाजी करून इतर चालकांना ड्युटी दिली जात होती. ड्युटी लावणारे अधिकारी वारंवार बुळे यांना त्रास देत होते. कामावर गेल्यावर ड्युटी न लावता शिवीगाळ
करून हाकलून दिले जात होते. त्यामुळे बुळे हे तणावाखाली होते.
बुळे यांनी २० एप्रिल रोजी पत्नीला फोन करून आरोपींनी मला ड्युटीमध्ये खूप त्रास दिला आहे. वेळोवेळी शिवीगाळ करत आहेत, असे रडतरडत सांगितले. ‘‘मला त्यांचा त्रास सहन होत नाही. मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही’’ असे ते बोलल्यावर पत्नीने त्यांची समजूत काढली. बुळे यांनी त्रास होत असल्याबाबत भाऊ गुलाब बुळे यांच्या फोनवर संदेश पाठविला. आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांच्या ११२ वरदेखील फोन केला होता. फोन येताच पोलिसांनी घराकडे धाव घेतली. पोलीस पोहोचेपर्यंत बुळे यांनी घरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह खाली काढला. चाकण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.