डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची 'चौकशी राॅ'कडे
सीविक मिरर ब्यूरो
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रीसर्च अँड ॲनॅलिसिस विंग- राॅ) चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांना कुरुलकर परदेशात भेटले होते. त्यांनी हेरांना नेमकी काय माहिती दिली तसेच ते पाकिस्तानी मोहजालात (हनी ट्रॅप) कसे अडकले, याची माहिती ‘राॅ’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना मोहजालात (हनी ट्रॅप) अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटाॅप आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला होता. त्या वेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. चौकशीत कुरुलकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटाॅप आणि मोबाइल संच राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना संवदेनशील माहिती दिल्याचा संशय आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर कुुरुलकरांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर देशातील अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील कर्नल प्रदीप राणा यांनी मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुलकर यांना ९ मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.