‘शासन’ आमदार बनसोडेंच्या दारी; राजकीय भूकंप?
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी आमदार बनसोडे यांची भेट घेतली. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी महिला माजी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अमित गावडे, भाजपचे माजी नगरसेवक शैलेश मोरे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सैय्यद आदींसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता, तेव्हादेखील अशीच चर्चा झाली होती.
अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा असून, इतरत्र चाचपणी करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. ते अजित पवार यांचे विश्वासू आणि जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात. शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. बनसोडे भविष्यात शिवसेनेत प्रवेश करणार का, अशी चर्चा देखील रंगली आहे. याबाबत शिंदे यांना विचारले असता, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत अण्णा बनसोडे हे आपल्या जवळचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अण्णा बनसोडे यांनीदेखील ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान सत्तास्थापन करताना अजित पवार यांना शेवटपर्यंत अण्णा बनसोडे यांनी साथ दिली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बनसोडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत शहरातील अनेक निर्णयांमध्ये बनसोडे यांचे मत विचारात घेतले गेले नसल्याचे दिसून आले होते. बनसोडे यांचे ऐन वेळी आमदारकीचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी बंडाचा पवित्र घेतला होता. त्यानंतर उमेदवारी बदलून बनसोडे यांना पुन्हा तिकीट दिले गेले आणि ते निवडून आले.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला झुकते माप देत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी-चिंचवडमध्ये असलेली एकहाती सत्ता भाजपने खेचून आणली होती. त्यानंतर आता पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये आणि राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे स्थान देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.