नद्यांना कॅनाॅलचे स्वरूप देऊ नका
नितीन गांगर्डे
पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प चालू आहे. तो ज्या पद्धतीने राबवला जात आहे त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे नदी प्रवाहात निर्माण होणारे अडथळे, पर्यावरणाची हानी, पूरस्थिती आणि नदी पात्रात सोडले जाणारे सांडपाणी यावर त्यांचा आक्षेप आहे. एक वर्ष साखळी पद्धतीने उपोषण करत त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यांच्या उपोषणाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यात हजारो पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला होता. त्या निमित्ताने या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सिद्धेश्वर घाटावर आपल्या अनुभवांची आणि प्रकल्पाची उजळणी केली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अजून तीव्र लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुठा आणि मुळा-मुठा या ४४ किलोमीटर लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन होईल, असा पुणे महानगरपालिकेचा दावा आहे. यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रात दोन्ही बाजूंना ३०-४० फूट उंचीच्या काँक्रीटच्या किंवा दगडी भिंती बांधून नदीला एखाद्या कॅनॉलसारखे स्वरूप दिले जाणार आहे. याला आमचा विरोध असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर यांनी दिली. या प्रकल्पात चार पूल तोडले जाणार आहेत. तोडल्या जाणाऱ्या पुलांपैकी एक भिडे पूल आहे. या पुलावरून रोज अक्षरश: हजारो वाहनांची ये-जा होत असते. कोथरूडवरून शनिवारवाड्याकडे जाण्यासाठी दुचाकी वाहनांना हा मार्ग अतिशय सोयीचा पडतो. मध्ये कोठेही सिग्नल नसल्यामुळे या प्रवासाला अवघी काही मिनिटेच लागतात. या प्रकल्पासाठी भिडे पूल तोडल्यावर आणि नदी पात्रातील रस्ते बुजवल्यावर वाहनांसाठी हा मार्ग बंद होणार आहे.
दोन्ही बाजूंना बांधण्यात येणाऱ्या भिंती नदीच्या पूररेषांच्या आत असल्यामुळे नदीपात्र अरुंद होऊन नदी प्रवाहाचा काटछेद मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रात भर घालून जमिनी निर्माण करण्यात येणार आहेत. नद्यांची रुंदीच कमी करण्याव्यतिरिक्त या नदीपात्रातील भिंतींचे गंभीर परिणाम होणार आहेत. या ३०-४० फूट उंच भिंतींचा पाया नदीपात्रात खोलवर घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नदीतील प्रवाहाचा दोन्ही नदीकाठांशी असलेला संपर्क तुटणार आहे. नद्या भूगर्भातील नैसर्गिक झरे अधिक प्रमाणात प्रवाहित करत असतात. या भिंतींमुळे ते प्रवाह कायमचे थांबतील आणि त्याचा भूजल पातळीवर परिणाम होईल.
एकूणच या प्रकल्पामुळे शहरातील पूर पातळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. अपूर्ण प्रक्रिया क्षमतेमुळे नद्यांमधील पाणी प्रदूषितच राहील. हा प्रकल्प म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन नसून केवळ काँक्रीटीकरणच आहे. नदीकाठावरील जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होईल, असा पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी एक वर्ष साखळी पद्धतीने उपोषण केले.
नद्यांचा विकास करायला आमचा विरोध नाही. नदीला मध्यवर्ती ठेवून विकास करायला हवा परंतू तसे होत नाही. पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने या प्रकल्पाला उपवास करत विरोध केला. अत्यंत शांत पण ठामपणे आम्ही आमचा विरोध सुरू ठेवणार असल्याचे 'जीवितनदी'च्या शैलजा देशपांडे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.