खचून जाऊ नका, पुढच्या तयारीला लागा

जय-पराजय होतच असतात. पराभवाने खचून जाऊ नका, पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार नाना काटेंना दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Mar 2023
  • 02:35 am
खचून जाऊ नका, पुढच्या तयारीला लागा

खचून जाऊ नका, पुढच्या तयारीला लागा

पवारांचा चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सल्ला

#पुणे

जय-पराजय होतच असतात. पराभवाने खचून जाऊ नका, पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार नाना काटेंना दिला आहे.  

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, माजी आमदार उल्हास पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभागनिहाय माहिती घेतली. कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केले, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कुठे कमी पडलो यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिली. भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, पैशांचा वापर, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती त्यांनी दिली.

सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणार्‍या महापालिका निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story