'हॉलमार्क'बाबतच्या अफवांचा बाऊ नको

सोने उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत सोन्याच्या विक्रीची नोंद व्हावी, ग्राहकांना शुद्धतेची हमी मिळावी यासाठी येत्या १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर सहा आकडी हॉलमार्कची नोंद केली जाणार आहे. ग्राहकांकडील जुन्या दागिन्यांसाठी हा बदल लागू नाही. मात्र, त्याची भीती दाखवून कमी भावात सोने विकत घेणारी टोळी कार्यरत झाली आहे. ग्राहकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Mar 2023
  • 12:57 pm
'हॉलमार्क'बाबतच्या अफवांचा बाऊ नको

'हॉलमार्क'बाबतच्या अफवांचा बाऊ नको

सहा आकडी हॉलमार्क व्यावसायिकांसाठी आता सक्तीचा, आंधळेपणाने दागिने मोडू नका, शहरातील केंद्रात सोन्याची शुद्धता तपासून घेण्याचे आवाहन

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

सोने उत्पादकापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत सोन्याच्या विक्रीची नोंद व्हावी, ग्राहकांना शुद्धतेची हमी मिळावी यासाठी येत्या १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर सहा आकडी हॉलमार्कची नोंद केली जाणार आहे. ग्राहकांकडील जुन्या दागिन्यांसाठी हा बदल लागू नाही. मात्र, त्याची भीती दाखवून कमी भावात सोने विकत घेणारी टोळी कार्यरत झाली आहे. ग्राहकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. उलट शंका आल्यास पुणे शहरातील २५ केंद्रांतून ग्राहकांनी अवघ्या ४५ रुपये प्रतितोळा दराने एका दागिन्याची शुद्धता पडताळून पाहावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केले आहे.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १ एप्रिल २०२३ पासून सराफांना सहा अंकी हॉलमार्कसह दागिने विकणे बंधनकारक केले आहे. तसेच, त्यांना पूर्वीच्या चार अंकी हॉलमार्क नोंदणीच्या जागी सहा अंकी हॉलमार्किंग करण्याची सूचना केली आहे. एप्रिलपासून केवळ सहा अंकी हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करावी लागणार आहे. मात्र, निर्णय लागू होणार असल्याने बाजारात जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. ग्राहकांनी या पूर्वी घेतलेल्या दागिन्यांना सहा अंकी हॉलमार्क आवश्यक असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. भीती पसरवून जुने दागिने कवडीमोल भावाने विकत घेतले जात आहेत. याशिवाय ग्राहकांना दागिने मोडण्यासही भाग पाडले जात आहे.

याबाबत माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य विजय सागर म्हणाले, हॉलमार्कच्या नियमातील नवीन बदलाचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्ती कार्यरत झाल्या आहेत. ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना सोने मोडायला भाग पाडतात. सोने मोडायला गेल्यानंतर त्यात दहा टक्के अथवा त्याहून अधिक खोट असल्याचे सांगितले जाते. जितकी खोट अधिक तितका त्या दागिन्याचा भाव पाडला जातो. नाईलाजाने ग्राहक कमी भावात सोने विकतो अथवा झळ सोडून दागिने मोडत असल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. नवीन प्रणाली केवळ विक्रेत्यांसाठी आहे. ज्या ग्राहकांना दागिन्यांबाबत शंका असेल अथवा खात्री करायची असेल तर त्यांनी हॉलमार्कच्या अधिकृत केंद्रांवर जावे. तिथे अवघ्या ४५ रुपये प्रतितोळा या दरानुसार त्यांना एका दागिन्याची शुद्धता पडताळता येते. ही शुद्धता १८, २२ आणि २४ कॅरेटमध्ये पडताळता येईल.

सोन्याच्या दागिन्यांचे विक्रेते वस्तुपाल रांका म्हणाले, हॉलमार्कच्या सहा अंकी क्रमांकाचा बदल येत्या एप्रिलपासून लागू होत आहे. त्यात उत्पादकापासून किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांपर्यंतचा सोन्याचा प्रवास नोंदवला जाणार आहे. पूर्वीच्या चार अंकी प्रणालीमध्ये या संपूर्ण प्रवासावर देखरेख ठेवता येत नव्हती. ग्राहकांना यात स्वतःला काही करावे लागणार नाही. जुन्या दागिन्यांमध्ये असा काही बदल करण्याची आवश्यकता नाही. यापुढे विक्री होणाऱ्या दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क क्रमांक नोंदवलेला असेल. ती दागिन्यांच्या शुद्धतेची हमी असेल. ग्राहकांनी निर्धास्त राहावे.  

विक्रेत्यावर जबाबदारी...

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार, सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेसाठी ज्वेलरच जबाबदार असेल. नियमांनुसार शुद्धता किंवा त्यासंबंधित कोणत्याही कमतरतेसाठी विक्रेता जबाबदार असेल. त्यापोटी नुकसान भरपाई देण्यासदेखील तोच जबाबदार असेल. संबंधित विक्रेत्याने दिलेल्या शुद्धता हमीपेक्षा त्यात घट आढळल्यास फरकाच्या दुप्पट भरपाई मिळवण्यास ग्राहक पात्र राहील, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य विजय सागर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story