श्वानांना मिळणार जलतरणाचा आनंद

शहरातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानाला पार्कमध्ये घेऊन जाता येणार आहे. हैदराबाद आणि वाशीच्या धरतीवर शहरात डॉक पार्क उभारण्यास महापालिका आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) मंजुरी दिली. पोहणे, विशेष ट्रॅकवर बागडणे आणि साहसी खेळ करता येणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:36 am
श्वानांना मिळणार जलतरणाचा आनंद

श्वानांना मिळणार जलतरणाचा आनंद

पालिकेची डॉग पार्कला मंजुरी, पथदर्शी प्रकल्पानंतर शहराच्या इतर भागांतही उद्याने उभारणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानाला पार्कमध्ये घेऊन जाता येणार आहे. हैदराबाद आणि वाशीच्या धरतीवर शहरात डॉक पार्क उभारण्यास महापालिका आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) मंजुरी दिली. पोहणे, विशेष ट्रॅकवर बागडणे आणि साहसी खेळ करता येणार आहेत.

पुण्यामध्ये श्वानप्रेमींची संख्या फार मोठी आहे. रस्त्यावरील श्वानांनाही खाऊ घालणारे, त्यांच्यासाठी प्रशासनाशी भांडणाऱ्या श्वानप्रेमींची संख्या मोठी आहे. शहरामध्ये ८ हजार श्वानांची नोंदणी आहे. मात्र, प्रत्यक्षात ८० हजार ते एक लाख पाळीव श्वान शहरात असतील असा अंदाज महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. श्वानांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी विशेष जागा राखीव करण्याची मागणी श्वानप्रेमींकडून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकातही डॉग पार्कला स्थान देण्यात आले होते. जवळपास पाच ते सहा एकर जागेत डॉक पार्क बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात जलतरण तलाव, शिडी, अडथळे पार करणे, रिंगमधून रांगत पुढे जाणे, बोगद्यातून जाणे अशी आकर्षक साहसी खेळणी या उद्यानात असतील. आपल्या आवडत्या श्वानाशी खेळता खेळता त्यांचा व्यायामही करून घेता येणार आहे.

याबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे-भोसले म्हणाल्या, डॉग पार्कला सोमवारी परवानगी मिळाली आहे. या पार्कसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्यानासाठी साधारण पाच ते सहा एकर जागा आवश्यक आहे. पुण्यातील विविध भागातील नागरिकांना सोयीचे व्हावे अशा जागेचा आम्ही शोध सुरू केला आहे. हा पथदर्शी प्रकल्प असणार आहे. त्याच्या यशस्वीतेनंतर शहरातील विविध भागात अशी उद्याने उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यात जलतरण तलावाबरोबरच इतर साहसी खेळ असतील. त्यासाठी आम्ही हैदराबाद आणि वाशीच्या डॉग पार्कचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवणार आहोत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story