देशाचे माझ्यावर प्रेम आहे का?
तन्मय ठोंबरे
सत्तेसाठी सुदानमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित यादवीत अडकलेली पुण्यातील तरुण उद्योजिका वडिलांसह भारतात परतण्यासाठी मागील दहा दिवसांपासून आटोकाट प्रयत्न करीत आहे. मदतीसाठी आर्त साद घालूनही सुदानमधून सुटकेसाठी भारतीय दूतावासाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने ‘‘भारतावर माझे प्रेम आहे, पण माझ्या देशाचे माझ्यावर प्रेम आहे का,’’ असा उद्विग्न सवाल तिने केला आहे.
पुणे कॅन्टाॅन्मेंटमध्ये राहणारी २६ वर्षीय समिना अख्तर (नाव बदलले आहे) आणि निर्यातदार असलेले तिचे वडील सुदानमधील यादवी युद्धात अडकले आहेत. त्यांना मायदेशी परतण्यासाठी आवश्यक प्रक्रिया भारतीय दूतावासाने १० दिवसांपासून पूर्ण केली नसल्याने दोघेही पोर्ट सुदान या शहरात अडकून पडले आहेत. ‘सीविक मिरर’ प्रतिनिधीने व्हाॅट्सॲप काॅलद्वारे समिनाशी मंगळवारी (दि. २५) संपर्क साधला असता तिने ही आपबीती कथन केली.
‘‘या घटनेमुळे माझ्या मनावर आयुष्यभरासाठी खोलवर ओरखडे ओढले गेले आहेत. आपला देश शांतताप्रिय जीवन जगण्याची हमी देतो. यामुळे माझे आपल्या देशावर प्रेम आहे. आपल्या देशात परतण्यासाठी १० दिवसांपासून आमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही आम्ही सुदान पोर्टमध्ये अडकून पडलो आहोत. भारताकडून मदत मिळेल, या आशेने जिकडे बघावे तिकडे सत्तापिपासू लोकांमुळे घडत असलेला विध्वंस आणि मृतदेह बघण्यापलीकडे आमच्या हातात काहीही नाही.
समिनाने इंग्रजी वाड्:मय या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिचे वडील निर्यातदार असून १२ वर्षांपासून ते सुदानमध्ये वास्तव्यास आहेत. तिला एक मोठा भाऊ असून तो वडिलांना व्यवसायात मदत करतो तसेच पुण्यात असलेल्या आपल्या कुटुंबीयांची काळजीदेखील घेतो. वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी समिना जानेवारीत सुदानला गेली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, ती १५ एप्रिल रोजी मायदेशी परतणार होती. कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींसह ईद साजरी करण्यासाठी तिचे वडीलही पुढच्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला भारतात येणार होते.
‘‘नेहमीप्रमाणे सर्व परिस्थिती सामान्य होती. विमानाने भारतात परतण्यासाठी मी १५ तारखेला खार्टूम येथील निवासस्थानाहून विमानतळावर आले. कस्टम आणि परतण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा सुरू होती. त्याचवेळी कान बधीर करणारा आवाज आला. विमानतळावर उपस्थित आम्ही सर्वजण कमालीचे घाबरलो. काही वेळाने विमानतळाबाहेर मोठा बाॅम्बस्फोट झाल्याचे कळले. त्यानंतर सर्वजण सैरावैरा पळायला लागले. सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. विमानतळाबाहेर आल्यानंतर घरी परतण्यासाठी मी टॅक्सी शोधत होते. पण ती मिळाली नाही.
पान १ वरून
अखेर तीन किलोमीटर पायी चालत मी घरी पोहोचले. या सर्व गडबडीत मी सर्व सामान विमानतळावरच विसरले. घरी परतताना रस्त्यावर मी पदोपदी मृत्यू अनुभवला. गोळीबार, लहानमोठे बाॅम्बस्फोट, कार आणि इतर वाहने चिरडणारे रणगाडे तसेच रणगाडाविरोधी गन खांद्यावर घेऊन धावणारे काही हल्लेखोर यांच्या तडाख्यातून स्वत:ला कशीबशी वाचवत मी घरी पोहोचले...’’ हा भयानक अनुभव सांगताना समिनाला अनेकदा अश्रू अनावर झाले होते.
त्याच दिवसापासून समिना आणि तिचे वडील सातत्याने भारतीय दूतावासाशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. ‘‘प्रारंभी दूतावासाने आम्हाला मदतीचे आश्वासन दिले. तुम्हाला घरून नेण्यासाठी गाडी येईल. परतण्यासाठी तयार राहा, असे सांगण्यात आले. मात्र, दूतावासाची गाडी अद्याप आलेली नाही. या संदर्भात आम्ही दूतावासासोबत कित्येक वेळा संपर्क साधला. मात्र, येथून परतण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळालेली नाही. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील, या व्यतिरिक्त दूतावासाच्या स्टाफकडून दुसरे कोणतेही उत्तर मिळत नाही. आम्हाला अरबी किंवा येथील स्थानिक भाषा येत नाही. आम्हाला किमान एखादा मदतनीस उपलब्ध करून द्या, अशी कळकळीची विनंती दूतावासाला अनेकदा केली. मात्र, ती मदतदेखील उपलब्ध करून देण्यात आली नाही. आमचा घरमालक कधीचाच पळून गेला आहे. आता घराबाहेर अखंडपणे सुरू असलेले गोळीबाराचे आणि बाॅम्बस्फोटांचे आवाज ऐकण्यापलीकडे आमच्या हातात काहीही उरलेले नाही,’’ असे समिना अगतिकपणे सांगत होती.
खार्टूममधून बाहेर पडण्यासाठी आम्ही अनेक वेळा खासगी वाहतूकसेवा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते असुरक्षित असल्याचे सांगत दूतावासाने जिथे आहात तिथेच थांबण्यास फर्मावल्याचा दावाही समिनाने केला.
माझे वडील आणि ४६ जणांचा गट यांनी मिळून एका बसची व्यवस्था केली आणि कसेबसे पोर्ट सुदान या शहरात येण्यात आम्ही यशस्वी ठरलो. येथून जहाजाने सौदी अरेबियाला जाता येते. खार्टूमवरून पोर्ट सुदानला आणून सोडण्यासाठी बस ड्रायव्हरने आमच्याकडून प्रत्येकी ३ हजार डाॅलर घेतले. एरवी सामान्य परिस्थितीत हे भाडे अवघे ४० डाॅलर इतके आहे. या प्रवासातील भयंकर गोष्ट म्हणजे, पोर्ट सुदानच्या मार्गावर असताना ड्रायव्हरने बस अचानक थांबवली आणि ‘आधी सर्वांनी पैसे द्या,’ म्हणून अडून बसला. ज्यांच्याकडे ३ हजार डाॅलर नव्हते, त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता बसमधून खाली उतरवण्यात आले. अखेर सोमवारी रात्री आम्ही कसेबसे पोर्ट सुदानला पोहोचलो. मी आणि वडील सध्या हजारो अडकलेल्या लोकांसह एका शाळेत राहात आहोत. या छावणीत आम्हाला झोपण्यासाठी बेड अथवा इतर कोणतीही सुविधा नाही. खाण्यासाठी वाईट दर्जाचे अन्न दिले जाते. कस्टम आणि परतण्याची इतर प्रक्रिया पूर्ण झालेले सुमारे ३०० लोक सोमवारी बोटीने सौदीला निघून गेले. आता आम्ही आमचा पासपोर्ट प्रवासाच्या मंजुरीसाठी दिला आहे. तो मिळाला तरच आमची सुदानमधून सुटका होऊ शकेल, असे सांगताना समिनाला हुंदका अनावर झाला होता.
सुदानमध्ये असाहाय्य परिस्थतीत असलेल्या समिनाला पुण्यात आपल्या कुटुंबीयांकडे परतण्याचे वेध लागले आहेत. अगदीच हीच अवस्था तिच्या पुण्यातील कुटुंबीयांचीही आहे. या १० दिवसांच्या कालावधीत केवळ सोमवारी (दि. २४) रात्री तिचा कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क होऊ शकला, तोही फारच कमी वेळ. यामुळे सुदानमध्ये अडकलेली समिना आणि पुण्यातील तिचे कुटुंबीय या दोघांचीही भेटीची तडफड वाढली आहे. समिना म्हणाली, ‘‘पुण्यात परतण्यासाठी मी किती आतूर आहे, हे शब्दांत सांगू शकत नाही. कधी एकदा कुटुंबीयांना भेटते आणि मित्रांसोबत पाणीपुरी खायला बाहेर जाते, असे झाले आहे.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.