खोदायचा, बुजवायचा, पुन्हा खोदायचा

कधी पाणीपुरवठा तर कधी मलनिस्सारण विभाग तर कधी खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरात कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरूच असते. महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत सातत्याने होणाऱ्या रस्ते खोदकामाबाबत सर्व विभागांना एकमेकांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 12:21 pm
खोदायचा, बुजवायचा, पुन्हा खोदायचा

खोदायचा, बुजवायचा, पुन्हा खोदायचा

खोदकामाबाबत महापालिकेने दिले समन्वयाचे आदेश; तरीही हिराबागेत उकरला नव्याने रस्ता

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

कधी पाणीपुरवठा तर कधी मलनिस्सारण विभाग तर कधी खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरात कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर खोदकाम सुरूच असते. महापालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत सातत्याने होणाऱ्या रस्ते खोदकामाबाबत सर्व विभागांना एकमेकांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती आहे. हिराबाग चौक ते राष्ट्रभूषण चौक या दरम्यानच्या रस्त्यावर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. आता त्याच ठिकाणी पुन्हा खोदकाम करून गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसह विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांचाही समावेश असतो. पालिकेच्याच विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने सातत्याने एकाच रस्त्यावर टप्प्याटप्प्याने खोदकाम केले जाते. एखाद्या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच खोदकाम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. रस्ता खोदल्यानंतर तो व्यवस्थितपणे समपातळीत बुजवला जात नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबतच अनेक तक्रारीही येतात.

या पार्श्वभूमीवर नुकतीच पालिकेत बैठक झाली. पथ विभागाने नव्याने रस्ता करण्याचे काम हाती घेतल्यास त्या ठिकाणी इतर विभागांनी कोणती कामे करायची आहेत, हे निश्चित करून रस्ता करण्यापूर्वी ती कामे करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच विविध कामे एकाचवेळी करावीत, जेणेकरून सतत रस्ते खोदून नागरिकांची अडचण होणार नाही, अशी सूचनाही दिली आहे, पण हे आदेश अद्याप कागदावरच आहेत. काही दिवसांपासून हिराबाग चौक ते राष्ट्रभूषण चौकादरम्यानच्या रस्त्यावर पालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक रस्त्यावर हे काम पूर्ण झाले असून पुढील भागात सुरू आहे.

पाईपलाईन टाकून झाल्यानंतर काँक्रीटने रस्त्याचा हा भाग बुजवण्यातही आला आहे. आता त्या शेजारीच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीने गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच केलेल्या खोदकामामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पुन्हा काही दिवसांतच त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी खोदकाम सुरू केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिक संभाजी गाठे म्हणाले, काही आठवड्यांपूर्वी हा रस्ता पाईपलाईनसाठी खोदला होता. पाईपचा आकार मोठा असल्याने मोठे खोदकाम केले होते. त्यामुळे आम्हाला परिसरात वावरायला अडचण व्हायची. वाहनांनाही मोठा अडथळा झाला होता. आता पुन्हा तिथेच नव्याने खोदकाम करण्यात येत आहे. एकच रस्ता विविध कामांसाठी खोदला जात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. रस्ता खराब होण्याबरोबरच नागरिकांनाही त्रास होतो आणि पैशांचाही अपव्यय होतो. याबाबत पालिकेच्या विविध विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाकडून पाईलपाईन टाकण्याचे तर त्याच ठिकाणाहून एमएनजीएल गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याचे पथ विभागाकडूनही मान्य करण्यात आले आहे. विभागाचे कनिष्ठ अभियंता सुहास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने खोदकामासाठी परवानगी घेतली असून त्यासाठीचे सुमारे ७० लाख रुपयांचे चलनही भरले आहे. त्यानुसार पथ विभागाने त्यांना आवश्यक मान्यता दिल्याने त्यांनी नुकतेच काम सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे घरपोच गॅस उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच हे काम सुरू आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story