हटवलेली दुकाने पुन्हा मूळ जागेवर

निवडणूक होताच कोकणे चौकातील अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर उतरले असून, याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या तोंडावर येथील पथारी व्यावसायिक खासगी मालकीच्या रिकाम्या पटांगणात स्थलांतरित झाले होते. मात्र, ते पुन्हा रस्त्यावर आल्याने येथील परिस्थिती मूळ पदावर आली आहे. पुन्हा वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना चालताना त्रास होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 11:11 am
हटवलेली दुकाने पुन्हा मूळ जागेवर

हटवलेली दुकाने पुन्हा मूळ जागेवर

‘पिंपरी चिंचवड ’मध्ये अतिक्रमण हटावचा देखावा पोटनिवडणुकीपुरताच; स्टॉलमुळे पादचाऱ्यांना आता चालणेही कठीण

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

निवडणूक होताच कोकणे चौकातील अतिक्रमण पुन्हा रस्त्यावर उतरले असून, याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या तोंडावर येथील पथारी व्यावसायिक खासगी मालकीच्या रिकाम्या पटांगणात स्थलांतरित झाले होते. मात्र, ते पुन्हा रस्त्यावर आल्याने येथील परिस्थिती मूळ पदावर आली आहे. पुन्हा वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना चालताना त्रास होत आहे.

शेतकऱ्यांच्या नावाखाली स्थानिक नेते आणि राजकीय पुढारी काही व्यापाऱ्यांना रस्त्यावर दुकाने थाटण्यास पाठबळ देत असल्याच्या तक्रारी येथील रहिवासी करीत आहेत. शेतकऱ्यांना त्याचा भाजीपाला आणि फळे तसेच अन्य काही पदार्थ थेट ग्राहकांना विक्री करता यावी म्हणून सुरुवातीला हे स्टॉल लावण्यात आले होते. आठवड्यातील काही ठराविक दिवस हे स्टॉल उभारले जात असून, आता शेतकरी कमी आणि व्यापाऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे.

आठवडी बाजार या नावातच आठवड्यातून एकदा भरवण्यात येणारा बाजार हे स्पष्ट असनाही केवळ राजकीय स्वार्थापोटी शहरात सर्वत्र सोयीनुसार दररोज हे बाजार भरवले जात आहेत. वाकड, पिंपळे-सौदागर, पिंपळे-निलख, सांगवी, रहाटणी, रावेत, निगडी प्राधिकरण, मोशी सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार होत असलेल्या त्रासाबाबत तक्रारी केल्या जात आहेत. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नगरसेवकाकडून या प्रश्नावर प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, अतिक्रमणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पोटनिवडणूक असताना एका उमेदवाराने तर या स्टॉलमार्फत कुणाल आयकॉन रोडवर प्रचार देखील करवून घेतला होता. आता तर महानगरपालिकांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कमी पैशात जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उतावळ्या भावी नगरसेवकांकडून हे केविलवाणे प्रकार केले जात असून, नागरिकांना रस्त्यावरून धोकादायक पध्दतीने चालण्यास भाग पाडले जात आहे. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत अशा नावाने जाहिरातबाजी करून सुरू झालेले हे आठवडी बाजार आता वाहतूक कोंडी, चालण्यास फुटपाथ नसणे, राजकीय नेत्यांची बॅनरबाजी अशा कारणांनी चर्चेत आले आहेत. शहरात प्रत्येक भागात महापालिकेने मंडई वसवली आहे. अधिकृत गाळे आणि मंडई परिसरात वाहने लावण्यासाठी पार्किंगची जागा उपलब्ध असल्याने रस्त्यावर-फुटपाथवर थाटली जाणारी ही दुकाने बंद व्हावीत ही मागणी आता पिंपरी-चिंचवडमध्ये जोर धरू लागली आहे.

शेतकरी आठवडी बाजारच्या नावाखाली जे लोक ही दुकाने लावत आहेत, ते ना शेतकरी आहेत ना शेतकऱ्यांशी संबंधित, त्यामुळे अशांवर कारवाई व्हावी यासाठी शहरातील अनेक सोसायटींनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. शासकीय पातळीवर एका विभागाकडून अन्य विभागाकडे ही पत्र पाठवणे आणि दिखावू कारवाई करण्यापलीकडे ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. फुटपाथवर आठवडी बाजाराचे स्टॉल आणि त्यापुढे खरेदीला आलेल्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच लावली जातात. स्मार्ट सिटी योजनेत वरील भागात फुटपाथ मोठे करण्यात आले आहेत. मात्र, त्याचा वापर राजकीय आशीर्वादाने अतिक्रमणासाठी सर्रासपणे होऊ लागला आहे.

 वाकड, पिंपळे-सौदागर, पिंपळे-निलख व सांगवी या भागातील अंतर्गत रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. त्यातच आता स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते अजूनच अरुंद झाल्यावर किमान तेथील फुटपाथवर विक्रेत्यांचे स्टॉल लागू नयेत आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी उपलब्ध होतील याची खबरदारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान पणन मंडळाने परवानगी दिलेले आठवडी बाजार हे अधिकृत आहेत. तर प्रभाग कार्यालयाकडून परवानगी घेऊन एखादा दिवस आठवडी बाजार भरवता येऊ शकतो. मात्र, फुटपाथवर अशाप्रकारे बाजार भरविल्यास आमच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story