बंदी झुंगारून अवजड ट्रक, डंपर धावताहेत रस्त्यांवर, प्रशासनाचे दुर्लक्ष
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
शहरात खडी, वाळू, डांबर अथवा अन्य बांधकाम साहित्य वाहून नेण्यास डंपर, कंटेनर, ट्रक आदी जड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी रहदारीच्या वेळेत बंदी आहे. पार्ट टाईम बंदी असूनही शहर, उपनगरांमध्ये जड वाहतूक सर्रास सुरू असल्याचे सीविक मिररच्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे जडवाहतूक प्रशासनालाच डोईजड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाघोलीतील केसनंद फाटा येथे बुधवारी कसबा पेठेतील दाम्पत्याला डंपरने चिरडल्याची घटना घडली होती. यात अशोक काळे आणि वर्षा काळे या दाम्पत्याला चिरडले. डंपर आणि ट्रकने चिरडल्याने यापूर्वीही अनेकांचा मृत्यू झाला आहे. बिबवेवाडी जंक्शन येथे फेब्रुवारीत झालेल्या अपघातात रुपाली कल्पेश बोरा (वय ३८) आणि गरिमा कल्पेश बोरा (वय८) या मायलेकींचा मृत्यू झाला होता. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला होता. त्यापूर्वी येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहासमोरील अपघातात मीना गिरीश राठोड (वय ३७, रा येरवडा) गंभीर जखमी झाल्या होत्या. नंतर त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सातववाडीमध्ये वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले होते. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. नीलेश तुकाराम साळुंखे (वय ३२) आणि मीनाक्षी नीलेश साळुंखे (वय ७) यांचा यात मृत्यू झाला होता. ही घटनाही सकाळच्या वेळेसच घडली होती.
आजही शहरात बंदी झुगारून डंपर सर्वत्र दिसतात. शनिवारवाडा आणि अगदी मध्यवस्तीतील पेठांत असे दृश्य क्वचित दिसते. मात्र, कोथरुड, कोंढवा, हडपसर, मुंढवा, खडीमशिन चौक, धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज, नऱ्हे आंबेगाव अशा भागांत हे दृश्य सर्रास पाहायला मिळते. यातील काही भागात जड वाहतुकीला बंदी नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील मध्यवस्तीत वाहतूक पोलिसांनी सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत बंदी घातली आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बोरा मायलेकींच्या घरातील सदस्य डॉ. नितीन बोरा म्हणाले, माझ्या वहिनी आणि पुतणीला मी अपघातात गमावले. मला वहिनी आणि पुतणीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह पाहावा लागला. आजही शहरात कोणत्याही वेळी डंपर, कंटेनर फिरताना सर्रास दिसतात. गर्दीच्यावेळी रस्त्यांवर जड वाहतुकीला बंदीच हवी. मात्र, याबाबत नियम करावा.. उपनगरांमध्ये अशी वाहतूक मोठ्याप्रमाणावर वाढली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक प्रशात कनोजिया म्हणाले की, शहर आणि उपनगरात गर्दीच्या वेळी होणारी जड वाहतूक पूर्णतः बंद झाली पाहिजे. अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. शहरात कोणत्याही वेळेस ट्रक, कंटेनर डंपर फिरताना सर्रास दिसतात. अशा वाहनांनी चिरडल्याने गेल्या काही महिन्यांत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अशा वाहनांमध्ये क्लीनर नसतो. चालकही निष्काळजीपणाने वाहन चालवताना दिसतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या वाहनांना दिवसा बंदीच घातली पाहिजे.
वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर म्हणाले, शहरातील मध्यवस्तीत सर्व प्रकारच्या जड वाहनांना गर्दीच्या वेळेत बंदी आहे. उपनगरांमध्ये सरसकट अशी बंदी नाही. उलट नगररस्ता, हांडेवाडी मार्गे जाणारा कात्रज-कोंढवा रस्ता, मार्केट यार्ड येथे अशी बंदी नाही. उपनगरांमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे तिथे सरसकट अशी बंदी घालता येणार नाही. मात्र, वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत आम्ही वाहन चालक आणि मालकांची लवकरच बैठक घेणार आहोत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.