खोटा निकाहनामा बनवून केली बदनामी, आरोपीला बुलढाण्यातून अटक
एका व्यक्तीचा बनावट निकाहनामा बनवून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांनी आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून अटक केली आहे. शेख खलील शेख जलीम (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख खलील याने एका व्यक्तीचा बनावट निकाहमाना बनविला होता. हाच निकाहनामा खरा असल्याचे तो सांगत असे. यामाध्यमातून आरोपी मुस्लीम समाजाची बदनामी करत होता.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीने चंदननगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, गेल्या ९ महिन्यांपासून आरोपी पोलिसांनी गुंगारा देत होता. अखेर ९ महिन्यानंतर शेख खलील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहेत.