दिवस दुसरा; अनेकांची 'पवारवापसी'?
विजय चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे रविवारी (२ जुलै) दुपारी राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, आता अजित पवार गटाला बंडानंतरचा पहिला धक्का बसला असून खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले आहे.
या शपथविधी सोहळ्याला खुद्द अमोल कोल्हे उपस्थित होते. एवढेच नाही, तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतानाचा एक व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाल्याचे सांगितले जात होते. अजित पवारांनीही सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, आज अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे ट्वीट करून स्पष्ट केले आहे.
अमोल कोल्हे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, 'जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुन। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है… पर दिल कभी नहीं,' असे म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील एक बोलका व्हीडीओही ट्वीट केला आहे. 'सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचं,' असे अमोल कोल्हे या व्हीडीओत म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या मते, कोणतीही माहिती न देता कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून सांगण्यात आले आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बहुसंख्य आमदार, पक्ष कार्यकर्त्यांनी शपथविधीच्या घटनेचा निषेध केला आहे. त्यामुळे इतरही अनेक आमदार मोठ्या साहेबांच्या गटात पुन्हा सामील होण्याची शक्यता बळावली आहे.
ज्या काही आमदारांना बोलावून घेतले त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली, याची माहिती आम्हाला अद्याप समजली नाही. काही आमदारांची दिशाभूल झाली. बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री / मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे पत्रच राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केले आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जाऊन आमदारांनी वर्तन केल्याने पक्षाच्या घटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातील ठराव पास झाला असल्याचे राष्ट्रवादीने पत्रातून म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांच्या सोबत गेलेल्या आमदार आणि नेत्यांना राष्ट्रवादीने पहिला कायदेशीर दणका दिल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. त्यापैकी कोणते आमदार कुणासोबत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे तीन आमदार आहेत. वाई मतदारसंघातून मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील आणि फलटणच्या राखीव मतदारसंघातून दीपक चव्हाण आमदार आहेत. त्यापैकी बाळासाहेब पाटील यांनी शरद पवारांची आणि आपली भूमिका एक असल्याचे सांगत सर्वप्रथम शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. मकरंद पाटील काल मुंबईत होते. मकरंद पाटील यांचा पाठिंबा अजित पवारांना होता असे बोलले जात होते. आज ते शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात दिसून आले. मकरंद पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे, ते शरद पवार यांच्यासोबत राहिल्यास अजित पवारांसाठी हा पहिला धक्का ठरू शकतो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.