रात्रंदिन आम्हा धुराचा प्रसंग

स्मार्ट सिटी म्हणून मिरवणारे पुणे शहर कचरा जिरवण्यात मात्र कमी पडत आहे. नागरिकच नव्हे तर महापालिकेचे कर्मचारीदेखील कचऱ्याबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. वाघोलीतील जेएसपीएम या प्रतिथयश शैक्षणिक संकुलाच्या आवाराजवळच काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत. तर, काही समाजकंटक दररोज कचऱ्याला आग लावून येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दिवस-रात्र धुरात राहण्याची वेळ आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 13 Mar 2023
  • 01:33 pm
रात्रंदिन आम्हा धुराचा प्रसंग

रात्रंदिन आम्हा धुराचा प्रसंग

वाघोली परिसरातील नागरिक त्रस्त, जेएसपीएम शाळेशेजारी रोज जाळतात कचरा

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

स्मार्ट सिटी म्हणून मिरवणारे पुणे शहर कचरा जिरवण्यात मात्र कमी पडत आहे. नागरिकच नव्हे तर महापालिकेचे कर्मचारीदेखील कचऱ्याबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. वाघोलीतील जेएसपीएम या प्रतिथयश शैक्षणिक संकुलाच्या आवाराजवळच काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत. तर, काही समाजकंटक दररोज कचऱ्याला आग लावून येत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दिवस-रात्र धुरात राहण्याची वेळ आली आहे.

वाघोली हे पूर्व पुण्यातील गजबजलेले उपनगर आहे. नगर रस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हा परिसर येतो. येथील जेएसपीएम शाळेच्या लगत मोठी लोकवस्ती आहे. शाळेलगतच्या मोकळ्या जागेची परिसरातील नागरिकांनी कचराकुंडी केली आहे. येथील कचरा बरेचदा रात्रीच्या वेळेस जाळण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. नेमक्या झोपायच्या वेळेस परिसरात प्रचंड धूर होतो. त्यामुळे रात्रीची झोपही अवघड झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी ‘सीविक मिरर’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. ज्या ठिकाणी कचरा जाळला जातो, त्याला खेटूनच मोठे शैक्षणिक संकुल आहे. त्यामुळे मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कचरा टाकणाऱ्या आणि जाळणाऱ्या अशा दोन्ही घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.  

वाघोलीतील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य शेडगे म्हणाले, ‘‘जेएसपीएम शाळेच्या परिसरातील मंथन मॅजेस्टिक आणि बकोरी फाटा परिसरातील नागरिकांना जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. कचरा करणारे आणि जाळणारे अशा सर्वांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे. ही कारवाई झाली तरच कचरा निर्माण होणे थांबेल.’’

‘‘गेले अनेक दिवस येथील मोकळ्या जागेत कचरा जाळला जात आहे. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसादेखील कोणीतरी येऊन कचरा पेटवून जातो.  कचरा गोळा करणारेही कधीकधी काडी लावून जातात. त्यामुळे परिसरात धूरच धूर निर्माण होतो. शेजारीच शाळा आहे. तेथील मुलांसह कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास होतो. इथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कचरा निर्माण झालाच नाही तर लोक तो जाळणार नाहीत.  येथील परिसराची पाहणी करून कचरा जाळणाऱ्यांवर जरब बसेल, अशी कारवाई केल्यास इतर नागरिक आपोआप सुधारतील,’’ अशी सूचना बकोरी फाटा येथील रहिवासी संदीप शिंदे यांनी केली.

‘‘जेएसपीएम शाळेच्या परिसरात किमान तीन हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. तेथील नागरिकांना सातत्याने कचऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. कधी कोण येऊन कचरा जाळतो, हे समजत नाही. अनेकदा रात्री कचरा जाळला जातो. त्यात प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे धूर आणि घाणेरडा वास सुटतो. त्यात आम्हाला रात्र काढावी लागते,’’ अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक विठ्ठल शिंदे यांनी दिली.  

नगर रस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी नामदेव बजबळकर म्हणाले, ‘‘जेसपीएम शैक्षणिक संकुल परिसरातून एक तक्रार आली होती. त्यानुसार एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. कोणी मोठ्या प्रमाणावर कचरा जाळत असल्यास त्याचा शोध घेतला जाईल. प्रसंगी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिसांत तक्रारही दिली जाईल. कचरा साफ करणारे कर्मचारी कचरा जाळत असल्यास त्यांना पाचशे रुपये दंड करून समज दिली जाईल. त्यानंतरही तसेच कृत्य करताना आढळल्यास त्याला कामावरून कमी केले जाईल.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story