दारुडा म्हणे, मी पोलीस

भामट्या पोलिसांकडून नागरिकांना लुटल्याचे, त्यांची फसवणूक केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात दिवसाढवळ्या प्रवाशांसमक्ष घडला. एक दारुडा आवारात उभ्या असलेल्या दुचाकींना साखळी लावत होता. पोलिसांनीच हे आपल्याला सांगितल्याचा दावा तो करत होता. त्यामुळे काही वेळ वाहनचालकही अवाक झाले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 10:53 am
दारुडा म्हणे, मी पोलीस

दारुडा म्हणे, मी पोलीस

पुणे स्टेशनमध्ये दुचाकींना लावत होता साखळी; पोलिसांनी केली तातडीने कारवाई

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

भामट्या पोलिसांकडून नागरिकांना लुटल्याचे, त्यांची फसवणूक केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात दिवसाढवळ्या प्रवाशांसमक्ष घडला. एक दारुडा आवारात उभ्या असलेल्या दुचाकींना साखळी लावत होता. पोलिसांनीच हे आपल्याला सांगितल्याचा दावा तो करत होता. त्यामुळे काही वेळ वाहनचालकही अवाक झाले. संबंधित दारुड्याने पुढे तुम्हाला पश्चात्ताप होईल, अशा धमकीच्या स्वरात त्याने वाहनचालकांना सांगितले. पण नंतर वाहतूक पोलीस आल्यानंतर त्याच्याकडील साखळी घेत गुन्हा दाखल करू, असे सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग आहे. बहुतेक प्रवासी खासगी वाहनांमधून किंवा कॅब, रिक्षातून स्थानकात येतात. मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावर प्रवाशांना सोडून ही वाहने निघून जातात. तिथे जास्त वेळ थांबता येत नाही. या लेनमध्ये वाहने उभी करून इतरत्रही कुठेही जाता येत नाही. संपूर्ण लेनमध्ये नो पार्किंग आहे. वाहने उभी असल्याचे आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. तसेच नो पार्किंगमधील दुचाकी वाहने उचलूनही नेली जातात. या वाहनांना पोलिसांकडून जॅमर जावले जातात. दोन दिवसांपूर्वी मात्र एक दारुडा हातात साखळी घेऊन नो पार्किंगमधील वाहनांना लावत असल्याचे आढळून आले.

'बघतोय रिक्षावाला' संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी या संपूर्ण प्रकाराचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले आहे. याविषयी ते म्हणाले, मी मुंबईला जात असताना स्थानकाबाहेरील रस्त्यावर गोंधळ दिसून आला. तिथे गेल्यानंतर एका मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीच्या हातात एक साखळी होती. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना तो ती साखळी लावण्याचा प्रयत्न करत होता. या व्यक्तीचे कपडे आणि वर्तनावरून तो दारुडा असल्याचे वाटत होते. वाहनाचे मालक त्याला साखळी लावू देत नव्हते. पण त्यानंतरही तो आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनीच सांगितले असल्याचे सांगत साखळी लावण्यासाठी 

ओरडत होता.

साखळी लावू देत नसलेल्या वाहनमालकाला त्याने हिंदीतून तुम्हाला याचा पश्चात्ताप होईल, अशी धमकीही दिल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी एक वाहतूक पोलीस कर्मचारी येतो. तो कर्मचारी नो पार्किंगमध्ये वाहन असलेल्या मालकाला वाहन लावण्यावरून ओरडतो. त्यावेळी क्षीरसागर हे मध्यस्थी करून संबंधित व्यक्तीकडे साखळी कशी आली, तुम्हीच त्याला सांगितले आहे का, अशी विचारणा करतात. पण त्याच व्यक्तीने साखळी घेतली, आम्ही त्याला दिली नाही, असे संबंधित पोलीस कर्मचारी म्हणत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसून येते. तसेच त्या व्यक्तीच्या थोबाडीत मारून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याकडून दिले जाते.

संबंधित व्यक्ती कोण होता, त्याच्याकडे ती साखळी कशी आली, तो ती वाहनांना का लावत होता, आता पोलीस त्याच्यावर कारवाई करणार का, असे प्रश्न क्षीरसागर यांनी उपस्थित केले आहेत. यावर आता पोलिसांनी काय कारवाई केली, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीचा आणि रेल्वेचा काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. नो पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story