Open Learning
राहुल शिंदे
rahul.shinde@civicmirror.in
TWEET@rahulsmirror
दररोज प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, प्रवेश घेऊन चार ते पाच महिने उलटले तरीही विद्यार्थ्यांना दूरस्थ प्रशाळेच्या माध्यमातून अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तसेच काही महाविद्यालयांनी मार्गदर्शन वर्गही सुरू केले नाहीत. त्यामुळे दूरस्थ अभ्यासक्रम राबवताना शिस्त पाळली जात नसल्याचे समोर आले आहे.
नोकरी करून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे अनेक गृहिणींना दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेऊन पदवी व पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळा हा स्वतंत्र विभाग सुरू केला. पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध महाविद्यालयांना प्रशाळेचे केंद्र दिले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना शनिवारी किंवा रविवारी प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाते. परंतु, ऑगस्ट २०२२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन वर्ग अद्याप सुरू झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या अंतर्गत बी.ए., एम. ए., बी. कॉम., एम. कॉम. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्याचप्रमाणे समुपदेशन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले जाते. दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या माध्यमातून सर्व केंद्रांना वर्ग सुरू करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, फर्ग्युसन महाविद्यालयाने वर्ग सुरू केले नाहीत. तसेच, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्यही उपलब्ध करून दिलेले नाही.
विद्यापीठाच्या दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या अभ्यासक्रमास एकूण ११ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात मुलांची संख्या ५ हजार १ एवढी असून, मुलींची संख्या ६ हजार ५८७ एवढी आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी बी.ए. अभ्यासक्रमास ७२८, बी.कॉम. अभ्यासक्रमास १ हजार १०१, एम. ए. अभ्यासक्रमास १ हजार ५२४, एम. कॉम अभ्यासक्रमाला २ हजार ८९ अशा एकूण ५ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत.
विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव म्हणाले, ''विद्यापीठातर्फे अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील काही केंद्रांना अभ्यास साहित्य पोहोच केले आहे. त्याचप्रमाणे समुपदेशन वर्ग घेण्यास सुरुवात करण्याबाबतचे लेखी आदेश दिले आहेत. मागील आठवड्यापासून वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. यंदा दूरस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाकडून पुढील आठवड्यात समुपदेशन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांसाठीचे अभ्यास साहित्य तयार आहे. लवकरच त्याचे वितरण केले जाईल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
- डॉ. वैभव जाधव, संचालक, मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळा,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
माझ्या मुलीने फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष बीए अभ्यासक्रमासाठी मागील वर्षी ऑगस्टमध्ये प्रवेश घेतला. चार महिने उलटून गेले तरी महाविद्यालयाकडून वर्ग सुरू करण्याबाबत निरोप मिळाला नाही. विद्यापीठाकडून सूचना प्राप्त न झाल्यामुळे समुपदेशन वर्गांना सुरुवात केली नसल्याचे महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून सांगण्यात आले.
- मेघना कालेकर, पालक
प्रवेश घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रवेश घेतल्यानंतर चार महिने विद्यार्थ्यांना घरी बसून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने आपल्या नियमावलीत बदल करून दूरस्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ करावे.
- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ