धरणे काठोकाठ, तरीही कपातीचा घाट
नितीन गांगर्डे
खडकवासला धरणसाखळीत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, शहरात दर गुरुवारी होणारी पाणीकपात कायम राहणार आहे. १ ऑगस्टनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यानंतर पाणीकपात करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या धरणात जमा झालेला पाणीसाठा पुढील वर्षभर पुरेल एवढा आहे, तरीही नागरिकांना पाणी कपातीचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
खडकवासला पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पाटबंधारे खात्याने नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग करणार असल्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही पुणे शहरात पाणीकपात का, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना ऑगस्टची वाट का पाहायची, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला असून, कपात तातडीने रद्द करून पुणेकरांना रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
खडकवासला धरण मंगळवारी सकाळी सहा वाजता ८७ टक्के भरले होते. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर लक्षात घेता मंगळवारी संध्याकाळी ८५६ क्यूसेक एवढ्या दाबाने पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली. खडकवासला धरणसाठ्यात ८१ टक्के पाणी जमा झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्रात मान्सून उशिरा बरसला. काही दिवस हजेरी लावल्यावर त्याने पुन्हा दडी मारली होती. मात्र, आता जुलैअखेर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत या चारही धरणांत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०.४८ टीएमसी म्हणजे, ७०.२१ टक्के पाणीसाठा होता. धरणक्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे
यंदा पाऊस कमी पडेल किंवा उशिरा पडेल असे गृहीत धरून धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पुण्यामध्ये दोन महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असून, परिणामस्वरूप खडकवासला धरण जवळपास भरल्याने मंगळवारी सकाळपासून या धरणातून मुठा उजव्या कालव्यातून, तसेच नदीतूनही जलसंपदा विभागाने १००० क्यूसेकने पाणी सोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणे भरली असल्याने आता पुण्यातील पाणीकपात या गुरुवारपासूनच रद्द करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले की, 'ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ती कार्यवाही करू, परंतु या आठवड्यात पाणीकपात कायम राहील. जसा मान्सून पुढे सरकतो तसे, पाण्याच्या पातळीत आणखी सुधारणा होण्याची आशा आहे.'