मेहुणीच्या घरावर डल्ला, आठ तोळ्यांच्या दागिन्यांसह आरोपी अटकेत
पुण्यातील कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात मेहुणीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कदीरपाशा पीरमहंमद सौदागर (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कोंढवा पोलिसांनी कदीरपाशाकडून आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सायंकाळी मेहुणी मुलीला घेऊन कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून कदीरपाशा मेहुणीच्या घरात शिरला.
त्यानंतर त्याने कपाटातून सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत २६ वर्षीय मेहुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मेहुणीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केली.