दिव्यांग खेळाडू
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
पुणे रेल्वे स्थानकातील असुविधांचा फटका परराज्यातील १५ दिव्यांग खेळाडूंना बसला आहे. स्थानकात दिव्यांगांसाठी लिफ्ट किंवा रॅम्प नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ८) रात्री हा प्रकार घडला. बेळगावला जाण्यासाठी हे दिव्यांग खेळाडू फलाट क्रमांक एकवर थांबले होते. गाडी सुटण्याच्या २० मिनिटे आधी गाडी फलाट क्रमांक चारवर येणार असल्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे त्यांची अचानक धावपळ उडाली, पण फलाट चारवर जाण्यासाठी सुविधा नसल्याने त्यांना ट्रॅकवरील पार्सलसाठीच्या मार्गावर धोका पत्करून जावे लागले. त्याआधी एक मालगाडी ट्रॅकवर आली होती. त्यानंतर फलाट क्रमांक तीनवर दुसरी गाडी बराच वेळ थांबली. त्यामुळे त्यांची गाडी हुकली. तासाभराने रेल्वेकडून त्यांना दुसऱ्या गाडीने रवाना करून स्थानकाच्या दुरवस्थेवर मदतीचा मुलामा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ईनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट, सद्गुरू सेवा प्रतिष्ठान आणि दिव्यांग विकास संस्था यांच्या वतीने रविवारी पुण्यात व्हील चेअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ४० दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बंगळुरू आणि हैदराबाद येथून हे खेळाडू आले होते. बंगळुरू येथून पंधराजण रविवारी सकाळी रेल्वेने पुण्यात आले होते. त्यापैकी दहाजण व्हील चेअरवर होते. स्पर्धा संपल्यानंतर रात्रीच ते रवाना झाले, पण त्याआधी रेल्वे स्थानकात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
बंगळुरू येथील एका संघाचा कर्णधार बसप्पा सुनाधोली याने घडलेला संपूर्ण घटनाक्रम ‘सीविक मिरर’कडे कथन केला. त्याचा संघ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तो म्हणाला, ‘‘आम्ही हुबळी गाडीने बेळगावकडे रवाना होणार होतो. ही गाडी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार होती. आम्ही १५ जण दहा वाजेपर्यंत स्थानकात आलो. ६ महिलांसह १० जण व्हील चेअरवर होतो. गाडी कोणत्या फलाटावर लागणार, याची काहीच माहिती नसल्याने आम्ही फलाट क्रमांक एकवरच थांबण्याचा निर्णय घेतला. रेल्वेकडून ११.४५ वाजता गाडीची घोषणा करत फलाट क्रमांक चारवर येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आमची धावपळ उडाली. तिथे जाण्यासाठी लिफ्ट किंवा रॅम्प नसल्याने आम्ही पार्सल विभागाकडून ट्रॅकवर असलेल्या मार्गाने निघालो. पण तेवढ्यात एक मालगाडी फलाट क्रमांक दोनवर येऊन थांबली. गाडी थोडी पुढे घेण्याची गार्डला विनंती केली, पण सिग्नल असल्याने त्यांनी नकार दिला.’’
‘‘मालगाडी दहा मिनिटांनी गेल्यानंतर आम्ही फलाट क्रमांक दोनवर गेलो, पण तेवढ्यात फलाट क्रमांक तीनवर हावडा एक्सप्रेस येऊन थांबली होती. तीही मार्गातच असल्याने जाता आले नाही. ही गाडी निघून जाईपर्यंत हुबळी गाडी निघून गेली. त्यामुळे आमचा हिरमोड झाला. आम्ही हुबळी गाडी थांबविण्याची विनंतीही केली होती. पण गाडी थांबवली नाही. त्यानंतर काही वेळाने रेल्वेचे अधिकारी आमच्याजवळ आले. त्यांनी मग दुसऱ्या गाडीतील दिव्यांगांसाठीच्या डब्यात आम्हाला पाठविले. त्यांनी आम्हाला मदत केली. ही गाडी सव्वा एकच्या सुमारास पुणे स्थानकातून रवाना झाली,’’ असेही बसप्पा याने सांगितले.
पुणे रेल्वे स्थानकातील सुविधांवर बसप्पाने प्रचंड नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘गाडी कोणत्या फलाटावर येणार हे केवळ २० मिनिटे आधी समजले. आम्ही स्थानकात आलो तेव्हाच हे समजले असते तर ही त्रास झाला नसता. पुण्यात रविवारी सकाळी रेल्वेनेच आलो. त्यावेळी पार्सल विभागाकडील मार्गाने बाहेर पडलो होतो. त्यामुळे जातानाही तोच पर्याय होता. पण अचानक मार्गात गाड्या आल्याने त्रास झाला. अत्यंत धोकादायक स्थितीत आम्हाला ही धावपळ करावी लागली. स्थानकात लिफ्ट किंवा रॅम्प नसल्याने आमच्यावर ही वेळ आली. त्यावेळी एखादी गाडी वेगात आली तर जीवघेणा अपघातही होऊ शकला असता. आमच्यापैकी बहुतेक खेळाडू व्हील चेअरवर होते. त्यामुळे कमी वेळेत फलाट बदलून पुढे जाणे शक्य नव्हते. याचा रेल्वेने विचार करण्याची गरज आहे. दिव्यांगांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात सुविधा असायला हव्या.’’
रेल्वेच्या असुविधांचा फटका नेहमीच दिव्यांगांना बसतो. मीही दिव्यांग असल्याने असा अनुभव घेतला आहे. आधीच आरक्षण केलेले असल्याने रेल्वेला दिव्यांगांची माहिती मिळते. त्यानुसार त्यांनी फलाट आणि रेल्वेगाड्यांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रविवारी रात्री खेळाडूंनी ट्रॅकवरील रस्त्यावरून केलेली ये-जा अत्यंत धोकादायक होती.
- अमोल शिनगारे, स्पर्धा आयोजक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.