दिवसाआड सायबर गुन्हा, महिन्याकाठी ६० कोटींना चुना

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात एक फौजदार आणि दोन कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घेतला आहे. सायबर गुन्ह्यांबाबत शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांचे नुकतेच एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 22 Jun 2023
  • 12:20 am
दिवसाआड सायबर गुन्हा, महिन्याकाठी ६० कोटींना चुना

दिवसाआड सायबर गुन्हा, महिन्याकाठी ६० कोटींना चुना

पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक फौजदार, दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती

रोहित आठवलेroh

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात एक फौजदार आणि दोन कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घेतला आहे. सायबर गुन्ह्यांबाबत शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांचे नुकतेच एक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असून, पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज ऑनलाईन ठकवले म्हणून किमान ३ गुन्हे दाखल होत आहेत.ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांकडून उच्चशिक्षितांसह ज्येष्ठ नागरिक, गृहिणींना दररोज किमान २५ लाखांना गंडा घातला जात आहे. मंगळवारी (२० जून) एकाच दिवशी फसवणुक प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील गंडा घालण्यात आलेली रक्कम ही कोट्यवधी रुपयांची आहे.

घरबसल्या नोकरी, जोडधंदा, नोकरीशिवाय फावल्या वेळात अतिरिक्त उत्पन्न अशा नावांखाली होणारी फसवणूक आता पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. ऑनलाईन स्वरुपात होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये लाईक-शेअर करायला सांगत युट्युब, फेसबूक, गुगल रिव्ह्यु आणि कालांतराने टेलिग्राम मधील ग्रुपला अॅड करून दररोज सामान्यांची बँक खाती रिकामी करण्याचा उद्योग जोमात सुरू आहे.

मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये परदेशात साखर निर्यात करण्याचे ९ कोटी रुपयांचे काम मिळवून देतो, असे सांगत त्यासाठी २० टक्के रक्कम अगाऊ द्यावी लागेल असे सांगून कुटुंबाची १ कोटी २९ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या कुटुंबासोबत मे २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. भाग्यश्री अनिकेत पाटील (वय ३२, रा. सेक्टर २५, प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तर जेकब जॉर्ज (वय ६३ रा.दिल्ली) आणि सतनाम सिंग (वय ५८ रा.पंजाब) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांचे पती आणि दिर यांना आरोपी जेकबने त्याचा परदेशात वस्तू आयात-निर्यातीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करत त्याच्या कंपनीला साखर कमी पडत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने आरोपी सतनाम सिंगचे नाव पाटील यांच्या कुटुंबीयांना सुचवले. सतनाम हा परदेशात पासकॉन अग्रो कंपनीद्वारे परदेशात साखर निर्यात करतो. तुम्ही त्याच्याकडून साखर घ्या, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीच्या पती व नवऱ्याने सतनामकडून २ हजार ६०० टन साखरेचे कोटेशन मागितले. त्यानुसार सतनामने ११ लाख ९६ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय ८ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये इतका भाव सांगितला. त्यानुसार २० टक्के रक्कम तुम्हाला अगाऊ द्यावी लागेल असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी त्यांच्या कंपनीतून एक कोटी ७९ लाख ९९ हजार ८०० रुपये सतनामच्या कंपनीला पाठवले. मात्र त्याने साखर दिली नाही, तसेच पैसे ही परत केले नाहीत. याबाबत विचारणा केली असता ५० लाख रुपये पाटील यांना परत केले. मात्र एक कोटी २९ लाख ९९ हजार ८०० रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली.

दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक केल्यावर अधिकचे व्याज देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर भागात घडला आहे. हिंजवडी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, गुंतवणूकदारांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ५ जून ते २० जून या कालावधीत बाणेर येथे ही घटना घडली आहे. राजेंद्र केशव आळेकर (वय ६१, रा. आनंदनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेहान एंटरप्रायजेसचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आळेकर, त्यांची पत्नी, मुलगा आणि अन्य ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवले. त्यातून गुंतवणूकदारांकडून आरोपींनी सात लाख ५६ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. आरोपींनी अशा प्रकारे अन्य गुंतवणूकदारांची देखील फसवणूक केली असल्याचे आळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर ओळख वाढवून महिलेच्य़ा विश्वासाचा गैरफायदा घेत पावणे दोन लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा तिसरा प्रकार चिंचवड परिसरात उघड झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिसली असून, अज्ञात मोबाईलधारक व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेशी व्हॉटसअॅप व टेलिग्रामवरून ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच ऑनलाईन चॅटींग करत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एक लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली.  

याचबरोबरीने सध्या पिंपरी-चिंचवड शहरात युट्युब, गुगल रिव्ह्यु, इन्टाग्राम व्हीडीओला लाईक करून प्रीपेड टास्कचे काम असल्याचे सांगून फसवणुकीचा रोज एक प्रकार घडत असून, असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. आकुर्डी येथील एका महिलेची १४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तर चाकण येथील एका कंपनीची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील शाडोफॅक्स टेक्नोलॉजीस्ट प्रा.लि. या कंपनीतील कामगार सागर लहू ढेरे (वय ३२ रा. खेड) याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे विवेक अनिल गोरटमारे (वय २९ रा. चाकण) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन फसवणुकीबरोबरीनेच पिस्तुल बाळगण्यासाठीचा ‘शस्त्र परवाना’ काढून देण्याच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे. २०२० मध्ये बावधन भागात घडलेल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मनोहर आबुराव दगडे (वय ४९, रा. बावधन बुद्रुक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तर राज उर्फ धनराज बाळू गायकवाड (वय ४५, रा. लोहगाव, पुणे), मेघराज गायकवाड (वय ४०, रा. लोहगाव, पुणे) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडे यांची राज याच्याशी बावधन येथे ओळख झाली. तेव्हा दगडे यांच्या भावाच्या मुलांना शस्त्र परवाना काढून देण्याचे आमिष राजने दाखवले. त्यासाठी आरोपींनी बँक आणि रोख स्वरुपात ३५ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन शस्त्र परवाना काढून न देता फसवणूक केली. शस्त्र परवाना हा पोलीस आयुक्तालयातून दिला जातो. त्यामुळे या फसवणुक प्रकरणात कोणा पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेऊन परवाना देतो, असे आरोपींनी सांगितले होते का याचा तपास आता हिंजवडी पोलिसांकडून केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story