अफूची शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर गुन्हा
# इंदापूर
अनेकदा काही शेतकऱ्यांनी गांज्याची शेती केल्याचे आपल्या कानावर येते. मात्र आता इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे अफूची सामूहिक शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इंदापूर पोलिसांनी १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपये किमतीची ७०८७ किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत.
काशीनाथ बनसुडे, दत्तात्रय बनसुडे, राजाराम शेलार, लक्ष्मण बनसुडे, माधव बनसुडे, रामदास शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. एन.डी.पी.एस.कायदा १९८५ चे कलम ८,१५, १८, ४६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी त्यांच्या माळेवाडी गावाच्या हद्दीतील जमिनीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर बेकायदेशीररित्या विनापरवाना व्यावसायिक हेतूने एकूण सात हजार ८७ किलो वजनाची अफूची झाडे लावली होती. सध्या पोलिसांकडून अफूच्या किंवा अन्य अमली शेतीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अमली पदार्थांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी
कारवाईचा तडाखा लावला आहे.
दरम्यान यापूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे येथे अफूची शेती करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करून अफूची बोंडे जप्त केली. अफूच्या बोंड्यांचे एकूण वजन ३३ किलो २०० ग्रॅम अफू मिळाला. मयूर उत्तम झेंडे असे शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांना या अफूच्या शेतीची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी सुरू केली होती. रात्रीपर्यंत पोलीस शोध घेत होते. मक्याच्या पिकात शेतकऱ्याने अफूची लागवड केल्याचे समोर आले होते. अफूची शेती करणे महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसतात. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरू असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.