फौजदाराच्या डोळ्यांत फवारला सराईत गुन्हेगारांनी मिरीचा स्प्रे
सीविक मिरर ब्यूरो
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याकडे संशयावरून चौकशीसाठी गेलेल्या फौजदाराच्या डोळ्यात मसाल्यातील काळ्या मिरीचा स्प्रे फवारून जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी (२६ जुलै) मध्यरात्री सव्वाबारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अमोल रमेश डेरे असे जखमी फौजदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निहाल हरपाल सिंग (वय ३५, रा. मुंबई), मंगेश लक्ष्मण गायकवाड (वय ३२, रा. रहाटणी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह संजय पडवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार डेरे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मेदनकरवाडी येथे गस्त घालत होते. त्यावेळी एका टपरीजवळ तिघेजण संशयित अवस्थेत थांबल्याचे दिसले. त्यामुळे पोलीस त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता एकाने फौजदार डेरे यांच्या डोळ्यात मिरीचा स्प्रे मारला. त्यात डेरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे प्लास्टिक बनावट पिस्तूल, मिरीचा स्प्रे, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले. निहाल आणि मंगेश या दोघांना अटक केली असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.
कंपनीतून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून लूटमार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी या भागात गस्त वाढवली आहे. मात्र तरीदेखील कामगारांच्या हातातील मोबाईल, खिशातील किरकोळ रोकड लुटून नेण्याचे प्रकार घडत असतात. त्याच बरोबर कंपनीमधील भंगार चोरून नेण्यासाठी काही टोळकी अंधाराचा आणि सध्याच्या पावसाचा फायदा घेऊन या भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी अधिकाऱ्यांसह गस्त घालून हे प्रकार रोखण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.
त्यानुसार चाकण पोलीस ठाण्यातील फौजदार आणि कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना वरील आरोपी अंधारात लपून बसल्याचे दिसले आणि पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना वरील प्रकार घडला आहे. अटक करण्यात आलेल्यांवर यापूर्वीच काही गुन्हे दाखल असून, त्या दोघांकडून लूटमारीच्या अन्य घटना उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.