दोन बहिणींचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
कंपनीत काम करताना पिण्याचे पाणी देण्यावरून ओळख झाल्यानंतर दोन बहिणींचा विनयभंग करून त्यांच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार चाकण-म्हाळुंगे पट्ट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजकुमार कुशवाह (रा. मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, मूळच्या उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या आणि सध्या म्हाळुंगे भागात वास्तव्याला असलेल्या २३ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे.
पीडित दोन्ही बहिणी आणि आरोपी कुशवाह म्हाळुंगे भागात शेजारी-शेजारी असलेल्या कंपनीत वर्षभरापूर्वी काम करत होते. कुशवाह हा त्याच्या कंपनीतून पीडित बहिणींना रोज पिण्याचे पाणी देत होता. यातून त्यांची ओळख झाली होती.
आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेऊन तक्रारदार तरुणीच्या लहान बहिणीशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोघी एकच मोबाईल वापरत असल्याने मोठ्या बहिणीला ही बाब समजली. तिने कुशवाहला फोन न करण्याबाबत सांगितले. मात्र, त्यानंतरही कुशवाहने लहान बहिणीला सुरुवातीला मैत्री करण्यास सांगितले आणि कालांतराने लग्न करण्यासाठी तगादा लावला. मैत्री आणि लग्न करण्यास नकार दिल्यास तोंडावर ॲॅसिड फेकण्याची धमकी दिली. 'आम्ही दोघेही नोकरीसाठी आलो आहोत. बाकीच्या गोष्टींना आमच्याकडे वेळ नाही, असे तक्रारदार तरुणीने कुशवाहला सांगितले आणि काही दिवसांसाठी दोघी गावाकडे निघून गेल्या.
नोकरीसाठी पुन्हा त्या म्हाळुंगे भागात आल्यावर कुशवाहने त्याच्या मित्राला फोन करण्यास सांगितले आणि तो दोघींचा पाठलाग करून त्यांना त्रास देऊ लागला. त्याने दोघी बहिणींच्या नावाने इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडून त्यावर आक्षेपार्ह मजकूर-फोटो टाकून त्यांची बदनामीही केली.