सौजन्य ‘ऐशा तैशांचे’

कोणत्याही सरकारी कार्यालयावरील फलक हे सरकारनेच लावणे अभिप्रेत असताना आणि तसा नियम असतानाही शहर आणि परिसरातील अनेक पोलीस चौक्यांवर अमक्याच्या-तमक्याच्या सौजन्याने असे फलक लागलेले दिसतात. गरजूंना रुपयाची मदत देताना हजार वेळा लोक विचार करतात. मात्र, पोलीस चौक्यांवर फलक लावण्यासाठी एवढे सौजन्य संबंधितांच्या अंगी कोठून येते, असा प्रश्न हा फलक पाहून पडतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 07:35 am
सौजन्य ‘ऐशा तैशांचे’

सौजन्य ‘ऐशा तैशांचे’

सरकारी कार्यालयाचे फलक कोणाच्याही सौजन्याशिवाय लागावे असा नियम आहे. मात्र, पुण्यातील पोलीस चौक्या सौजन्य फलकांनी भरून गेलेल्या आहेत.

संपत मोरे

feedback@civicmirror.in

कोणत्याही सरकारी कार्यालयावरील फलक हे सरकारनेच लावणे अभिप्रेत असताना आणि तसा नियम असतानाही शहर आणि परिसरातील अनेक पोलीस चौक्यांवर अमक्याच्या-तमक्याच्या सौजन्याने असे फलक लागलेले दिसतात. गरजूंना रुपयाची मदत देताना हजार वेळा लोक विचार करतात. मात्र, पोलीस चौक्यांवर फलक लावण्यासाठी एवढे सौजन्य संबंधितांच्या अंगी कोठून येते, असा प्रश्न हा फलक पाहून पडतो. खडक, विश्रामबाग, बंडगार्डन, फरासखाना या पोलीस स्टेशनच्या अंकित अनेक पोलीस चौक्यांवर असे सौजन्याचे फलक लागलेले दिसतात.

कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फलकावर कार्यालयाचे नाव, पत्ता  आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे. मात्र, हे फलक सरकारी निधीतून तयार केलेले असावे आणि त्यावर खासगी नावाचा उल्लेख नसावा असा नियम, संकेत आहे. मात्र, पुण्यातील पोलीस चौक्यांतील फलक तर खासगी लोकांच्या सौजन्याने भरून गेलेले आहेत. स्थानिक मंडळे, खासगी उद्योजक, संस्थांनी हे सौजन्य दाखवत पोलीस चौक्यांना हे फलक बनवून दिलेले आहेत. मात्र, हे सौजन्य केवळ पोलीस विभागापुरतेच मर्यादित आहे.

अन्य सरकारी कार्यालयांनाही अशा फलकाची गरज असते. मात्र, तेथे सौजन्य दाखवायला कोणीही पुढे आलेले दिसत नाही. त्यामुळे पोलीस चौक्या सोडल्या तर अन्यत्र सौजन्याची ऐशी-तैशी झालेली दिसते. तसेही पोलीस चौक्यांना कोणी आणि का हे फलक देण्यात सौजन्य दाखवले, असा प्रश्नही अनेक वेळा पडतो.

पुणे शहरातील गुंड, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी पाच वर्षांपूर्वी असे सौजन्य दाखवत फलक लावल्याचे निदर्शनास आले होते. स्वतःच्या नावाची जाहिरात करणे आणि पोलिसांशी आपली जवळीक दाखवणे हा त्यामागचा उद्देश. जनतेची दिशाभूल करण्यासाठीही असे फलक काही लोकांनी लावले होते. ही बाब लक्षात आल्यावर असे फलक लावले जाऊ नयेत. तसेच कोणत्याही खासगी व्यक्तीकडून पोलीस स्टेशन, चौक्यांनी कोणतीही भेटवस्तू घेऊ नये, असे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्याअगोदर डिजिटल यंत्रणेचा फायदा घेत सौजन्य फलक लावले जात आहेत. काही ठिकाणी तर एकाच पोलीस चौकीच्या बाहेर एका संस्थेने सौजन्य दाखवले आहे, तर आतील फलकावर दुसऱ्याच संस्थेने सौजन्य दाखवले आहे. थोडक्यात, पोलीस चौक्यांना सौजन्य फलक देण्याची एक स्पर्धा लागली असल्याचे चित्र आहे.

याबाबत आपचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, "एखाद्या शासकीय कार्यालयावरचा फलक खासगी व्यक्तीने लावणे हे चूक आहे. पुण्यात अनेक ठिकाणी असे फलक आहेत. सौजन्याचे फलक लावण्याची गरज नाही. ही बाब काही वर्षांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली होती, काही प्रमाणात फलक निघाले. नंतर मात्र असे फलक पुन्हा दिसू लागले आहेत. पोलीस चौक्या असे फलक खासगी लोकांकडून का स्वीकारतात यावर विचार केला पाहिजे. अनेकदा पासपोर्टचे दाखले घेण्यासाठी आले की त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला काही भेटवस्तू मागितल्या जातात, मग भेटवस्तू देणारे स्वतःचे नाव टाकून भेटवस्तू देतात.

दरम्यान याबाबत मिरर प्रतिनिधीने पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘हा प्रकार काय आहे ते मी बघतो’, अशी प्रतिक्रिया दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story