भारतीय कंपनीचे कफ सिरप धोकादायक
#नवी दिल्ली
भारतीय कंपनीने बनवलेले धोकादायक कफ सिरप मार्शल आयलंड आणि ओशनियामधील मायक्रोनेशियामध्ये सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. या निकृष्ट दर्जाच्या सिरपचा अहवाल (ग्वायफेनेसिन सिरप) जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवला होता, त्यानंतर संघटनेने हे सिरप मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले आहे.
या हानिकारक सिरपची निर्मिती पंजाबमधील क्यूपी फार्मा केमिकल लिमिटेड या कंपनीने केली आहे, तर या सिरपची मार्केटिंग हरयाणातील ट्रीलियम फार्मा कंपनी करते. मात्र उत्पादक किंवा विक्रेत्याने उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल हमी दिली नसल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ग्वायफेनेसिन या सिरपचा वापर खोकल्यावर केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनच्या (टीजीए) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांद्वारे मार्शल बेटांमधील ग्वायफेनेसिनच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि त्यात डायथिलिन ग्लायकोल आणि इथिलिन ग्लायकोल हे दूषित पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले.
विश्लेषणात म्हटले आहे की दूषित पदार्थ डायथिलिन ग्लायकोल आणि उथिलिन ग्लायकोल हे मानवांसाठी विषारी आहेत. याचे सेवन केल्यावर हे प्राणघातक ठरू शकतात. आरोग्य संघटनेनेही यास दुजोरा दिला आहे. हे सिरप निकृष्ट दर्जाचे आहे. याचा वापर केल्यास विशेषत: मुलांमध्ये गंभीर आजार, किंवा मृत्यू होऊ शकतो. पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, लघवी करण्यास त्रास, डोकेदुखी, मानसिक स्थितीवरदेखील परिणाम होऊ शकत असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
वृत्तसंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.