जेजुरीच्या १५० दीपमाळांचे संवर्धन

जेजुरी गडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास होणार असून त्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात १०९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या १५ दिवसांत याबाबतचा कार्यादेश निघण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा आणि शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी सुमारे १५० दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या असून त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:43 am

जेजुरीच्या १५० दीपमाळांचे संवर्धन

पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धन तर दुसऱ्या टप्प्यात शहर विकासाला मिळणार प्राधान्य

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

जेजुरी गडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास  होणार असून त्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात १०९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या १५ दिवसांत याबाबतचा कार्यादेश निघण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा आणि शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी सुमारे १५० दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या असून त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे.

मंदिराचे काम मुख्यत्वे दगडात झालेले आहे. बांधकाम खूप जुने असल्याने जीर्ण झालेले दगड  आता बदलण्यात येणार आहेत. तसेच सुस्थितीत असलेल्या दगडांना पॉलीशद्वारे चमकदार करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी १५० दीपमाळा असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व दीपमाळा सध्या पुनर्स्थापित करता येणे शक्य नसले, तरी त्यातील जेवढ्या जमतील तेवढ्या दीपमाळा पुन्हा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन करताना जीर्ण दगड बदलून त्याला पॉलीशही केले जाणार आहे.   हे काम मुख्यत्वे चुन्यात केले जाणार आहे. जेजुरी गडावरील मंदिराच्या विकासाचे, तसेच संवर्धनाचे काम या टप्प्यात होणार आहे.

मंदिराचा गडावरील परिसर १२४० चौरस मीटरचा असून पहिल्या टप्प्यातील कामात मंदिराचे संवर्धन आहे त्या स्थितीत केले जाणार आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. गडाचे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे. याच कामासाठीची दुसरी १८ कोटींची निविदाही लवकरच काढण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. ती परिस्थितीनुसार असली तरी अभ्यासपूर्ण नसते. त्यामुळे अशा डागडुजीला आता नवे स्वरूप मिळणार आहे.

मंदिर संवर्धन हा जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा विकास, रस्ते, पाणी, निवासी व्यवस्थेचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story