काँग्रेसचा 'हात' ८ वर्षांनंतर जल्लोषासाठी भवनाबाहेर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पस्तीस वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विसाव्या फेरीअखेर ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा धक्कादायक पराभव केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:41 am
काँग्रेसचा 'हात' ८ वर्षांनंतर जल्लोषासाठी भवनाबाहेर

काँग्रेसचा 'हात' ८ वर्षांनंतर जल्लोषासाठी भवनाबाहेर

भाजपचा बालेिकल्ला असलेल्या कसब्यातील विजयामुळे पक्षाला िमळणार पुण्यात नवसंजीवनी?

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पस्तीस वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विसाव्या फेरीअखेर ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा धक्कादायक पराभव केला. या निकालाने शहरात कॉंग्रेसचा एकमेव का होईना पण आमदार मिळाला आहे.या विजयानंतर कॉंग्रेस भवनात तब्बल आठ वर्षांनंतर जल्लोष साजरा करण्यात आला. कधी नव्हे तो 'हाता'च्या पंजाची आतल्या खोलीत धूळ खात पडून असलेली प्रतिकृती बाहेर आली आहे. एरवी ओसाड असलेल्या कॉंग्रेस भवनात कधी नव्हे ती गर्दी ओसंडून वाहताना दिसली. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. निवडणुकीत सन १९९१ च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले.

१९९१ मध्ये विद्यमान खासदार गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर मात्र बापट यांनी मतदारसंघाची बांधणी करत कसबा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व ठेवले होते. ते या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले होते. ते खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याने कसब्यात पस्तीस वर्षांनंतर परिवर्तन झाल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा केलेला दणदणीत पराभव ही महाराष्ट्रातील भावी राजकारणाची दिशा दाखवते. सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ देखील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे काँग्रेसने स्वतःकडे खेचून आणला. या मतदारसंघात भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती व गुंडशक्ती याबरोबरच सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करूनही मतदारांनी भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच नाकारले. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असा फौजफाटा घेऊन उतरलेल्या भाजपने आजारी असणाऱ्या खा. गिरीश बापट यांनादेखील प्रचारात उतरवण्याचा प्रयत्न केला. काहीही करून निवडणूक जिंकायची यासाठी भाजप कोणत्या थरापर्यंत जाते, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र कसब्यातील सूज्ञ मतदारांनी भाजपला झिडकारून महाविकास आघाडीला दणदणीत मतांनी विजयी केले. याबद्दल सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो.

अन्य एक पदाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, आगामी महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकांपाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरिता कसबा पेठ आणि शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांतील विजयांमुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. राज्य काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यातून विस्तव जात नाही. अन्य नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. पक्षांतर्गत हेवेदावे असले तरी भाजपच्या विरोधात सामान्य जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे हे अलीकडील निकालांवरून निष्पन्न झाले. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राज्यातील वातावरण काँग्रेसला अनुकूल झाल्याचा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. आपापसातील वाद मिटवत पक्ष एकसंघ राहिल्यास राज्यात पक्षाला चांगले यश मिळू शकते. अर्थात, जुन्या चुका दुरुस्त केल्या तरच हे शक्य असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्ष हे एकेकाळी समीकरण होते. राज्य विधानसभेत काँग्रेसचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून येत असत, पण २०१४ पासून देशाप्रमाणेच काँग्रेसची राज्यात पिछेहाट सुरू झाली. २०१९ मध्ये तर राष्ट्रवादीने मागे टाकल्याने काँग्रेसच्या जखमेवर मिठ चोळले गेले होते. कसबा पेठेमधील विजयाने काँग्रेसला आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बळ मिळाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story