काँग्रेसचे नागरिकांच्या ‘कानाखाली’ आंदोलन
सीविक मिरर ब्यूरो
पुणे महापालिका भवनसमोर क्रांतिदिनाच्या निमित्ताने नागरी समस्यांवर आंदोलन सुरू असताना सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केल्याने संयोजक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला.
सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर आणि अमित सिंग यांनी क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, खड्डे, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, वाहतूक कोंडी यासह इतर प्रश्नांवर आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या समोर आंदोलनात सहभागी झाले.
महापालिका प्रशासनाकडून विविध प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने नागरिकांच्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी विरोध दर्शविल्यानंतर आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला आणि त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
राजकीय पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्याने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेतला. हे पदाधिकारी श्रेय घेण्यासाठी आले आहेत. आज जी स्थिती आहे, त्यास ते देखील जबाबदार आहेत, अशी टीका करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष शिंदे यांनी यावर आक्षेप घेत आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेलो आहोत, असे स्पष्ट केले. याप्रश्नी आमच्याशी चर्चा करा असे सुचवले. त्यानंतरही भाषण सुरू असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माईक हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी केसेकर आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, त्यात केसेकर यांना मुकामार लागला आहे.
केसेकर म्हणाले, शहरातील समस्यांवर नागरिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन सुरू केले होते. त्यामध्ये राजकीय पक्षांना बोलाविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी निघून जावे असे सांगितल्याने, मला काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘संयोजकांनी निमंत्रण दिल्याने आम्ही आंदोलनात सहभागी झालो. यावेळी आमच्याकडे पक्षाचे झेंडे नव्हते, पण आमच्यावरच टीका सुरू केल्याने त्यावर आक्षेप घेतला. काही कार्यकर्त्यांनी माईक काढून घेताना किरकोळ धक्काबुक्की झाली.