पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस-वे'वर सलग तीन सुट्यांमुळे कोंडी
अनुश्री भोवरे
anushree.bhoware@punemirror.com
TWEET@Anu_bhoware
मुंबई आणि पुण्यातील उन्हाच्या वाढत्या पाऱ्याला कंटाळून थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा बाहेर फिरण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या पर्यटकांना शनिवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शनिवार, रविवार आणि सोमवारी महाराष्ट्रदिनाची (१ मे) सुटी अशा तीन सुट्या लागून आल्याने अनेक लोक परगावी जाण्यासाठी किंवा पर्यटनासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच महामार्गावर गर्दी झाली होती.
मुंबई आणि पुण्याला जोडणारा बोरघाट, खालापूर टोल अशा काही ठिकाणांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. महामार्ग पोलीस दलातील २० हून अधिक कर्मचारी व अधिकारी वाहतूक नियमन करण्याचे प्रयत्न करत होते. माणगाव आणि भिवंडीकडे जाण्याच्या रस्त्यांवरही वाहनांची मोठी गर्दी होती. रायगड पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच अवजड वाहनांना रस्त्याच्या कडेला उभे केले होते. शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी पहाटे ५ पर्यंतच्या वेळातील वाहतुकीचा अतिरिक्त भार यामुळे थोडा सुसह्य झाला. मात्र, त्यानंतरही कोंडी झाली. साधारण १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
'सुट्टीचे दिवस टाळावे'
महामार्ग पोलिसांनी सांगितले की, 'वाढत्या उष्म्यामुळे नागरिक थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र, सलग लागून आलेल्या सुट्या टाळून त्यांनी नियोजन करावे. महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास केवळ नागरिकांना होतो असे नाही, तर प्रशासनावरही त्याचा ताण येतो आणि अपघाताचेही धोके वाढतात. नागरिकांनी वाहतूक अपडेट बघावे आणि गर्दीच्या वेळा टाळून घराबाहेर पडावे.'