पाचगाव पर्वतीवर सामूिहक वृक्षतोड

शिक्षणासोबत हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे नावाजल्या जाणाऱ्या पुण्यातील पाचगाव टेकडीवर राजरोसपणे सामूहिक झाडतोड केली जात आहे. अगदी कौटुंबिक सोहळा असल्याप्रमाणे परिसरातील लोक बायका-मुलांसह येऊन लहान घेराची झाडे, झाडांच्या फांद्या तोडून नेत असल्याचे दृश्य दिसत आहे. इतक्या उघडपणे झाडांची कत्तल होत असताना वन विभागाकडून त्यांना अशी सवलत का दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 11:17 am
पाचगाव पर्वतीवर सामूिहक वृक्षतोड

पाचगाव पर्वतीवर सामूिहक वृक्षतोड

दिवसरात्र चालतोय झाडे तोडण्याचा सामूहिक कार्यक्रम, वनविभागाचे दुर्लक्ष

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शिक्षणासोबत हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे नावाजल्या जाणाऱ्या पुण्यातील पाचगाव टेकडीवर राजरोसपणे सामूहिक झाडतोड केली जात आहे. अगदी कौटुंबिक सोहळा असल्याप्रमाणे परिसरातील लोक बायका-मुलांसह येऊन लहान घेराची झाडे, झाडांच्या फांद्या तोडून नेत असल्याचे दृश्य दिसत आहे. इतक्या उघडपणे झाडांची कत्तल होत असताना वन विभागाकडून त्यांना अशी सवलत का दिली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.        

तळजाई टेकडी शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली आहे. पाचगाव पर्वती म्हणूनही तिची ओळख आहे. सुमारे एक हजार एकरवर तिचा विस्तार आहे. केवळ आजूबाजूचे नागरिकच नव्हे तर शहराच्या विविध भागातील नागरिक या टेकडीवर सकाळी आणि सायंकाळी फिरण्यास येत असतात. या टेकडीवर हजारो वृक्ष असून येथे मोर सहज वावरताना दिसतात. ससे आणि क्वचित सापाचेही इथे दर्शन होते. या टेकडीला रहिवासी इमारती, झोपडपट्टीचाही शेजार आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून इथे सायंकाळी मोठ्या प्रमाणावर सामूहिक वृक्षतोडीचा कार्यक्रम चालतो. अनेकदा सकाळी देखील आडबाजूला झाडाच्या फांद्या तोडून नेण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. आधीच वन विभागाने येथील परदेशी झाडे काढून टाकून तिथे देशी वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बराच भाग मोकळा झाला आहे. आता या सामूहिक वृक्षतोडीमुळे भिंतीलगतची झाडे हळूहळू तोडली जात आहेत. सुरुवातीस खाली पडलेल्या काड्या गोळा करण्याचे निमित्त ही मंडळी करीत होती. त्यानंतर झाडाच्या फांद्या तोडू लागली. आता लहान खोड असलेली झाडे, झाडाच्या फांद्या तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. 

वेळीच लक्ष न दिल्यास उन्हाळ्यात भिंतीलगतचा बराचसा भाग मोकळा होण्याची भीती फिरायला येणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.

तळजाईत फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनी 'सीविक मिरर'कडे याची तक्रार केली. त्यानंतर सीविक मिररच्या प्रतिनिधीने त्याची खातरजमा करण्यासाठी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळजाईला भेट दिली. तेव्हा वन विभागाने लावलेल्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील फलकापासून ते ४ किलोमीटर अंतराच्या फलकाजवळ काही कुटुंब झाडे तोडत असल्याचे दिसले. एका मुलाला आणि मध्यमवयीन पुरुषाला विचारले असता जळणाला लाकूड नेत असल्याचे त्याने बिनधास्त सांगितले. झाडं का तोडताय असे विचारले असता 'वाळलेलीच झाडे तोडतो' असे त्यांनी उत्तर दिले. काही कुटुंबातील महिला, मुले आणि पुरुषही यात सहभागी असल्याचे दिसले. एक व्यक्ती तर सात किलोमीटर अंतरावरील फलकाजवळ झाडाचे मोठे लाकूड डोक्यावरून नेताना दिसला. वडगाव, धायरी आणि जनता वसाहत परिसरातील काही व्यक्ती इथे सर्रास झाडे तोडून नेत असल्याचे फिरायला येणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले.      

याबाबत तळजाई ट्रेकर्सचे प्रदीप भोकरे म्हणाले, अनेक दिवसांपासून हा झाडाच्या फांद्या तोडण्याचा प्रकार सुरू आहे. लहान झाडे तर सर्रास तोडली जात आहेत. मी त्यांना एक-दोनदा हटकले होते. मात्र, वाळलेली झाडे अथवा फांद्या तोडत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. भिंतीकडील भागात काहीसे आत गेल्यास त्यांनी केलेली वृक्षतोड लक्षात येते. वडगाव, धायरीच्या ठिकाणी राहणारे वस्तीतील लोक जळणासाठी इथूनच लाकडे नेतात. 'झाडे लावा, झाडे जगवा', 'सामाजिक वनीकरण ही काळाची गरज आहे' अशा घोषणा देणाऱ्या आणि हिरवाईचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाला पाचगाव पर्वतीवरील झाडांची दिवसाढवळ्या होणारी कत्तल का रोखता येऊ नये, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, वनक्षेत्रात प्रवेश करू नये म्हणून आठ किलोमीटर अंतराची भिंत घालण्यात येत आहे. यातील ५ किलोमीटर अंतराचे काम झाले आहे. भिंतीचे अपुरे काम असलेल्या ठिकाणाहून लोक आतमध्ये प्रवेश करतात. लोकांनी असे प्रकार होताना दिसल्यास तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली पाहिजे. अशी झाडे तोडणाऱ्यांना शोधून आम्ही त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देऊ. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story