प्रदूषणकारी कंपनी ४८ तासांत बंद करा
विजय चव्हाण
प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नगर रस्त्यावरील शालिरेक्स पॉलिव्हिनाईल प्रा. लि. कंपनीचे उत्पादन ४८ तासात बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) दिले आहेत. कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी एमपीसीबीने केलेल्या स्थळपाहणीत कंपनीने अनेक पर्यावरणविषयक कायद्याचा भंग केला असल्याचे समोर आले होते. याबाबत सुचविलेल्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कंपनीचे उत्पादन ४८ तासांत बंद करण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत.
नगर रस्त्यावरील सणसवाडीतील शालिरेक्स कंपनीमध्ये पीव्हीसी कोटिंगचे काम केले जाते. दरम्यान, कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होत असल्याची तक्रार स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तसेच निमगाव म्हाळुंगी गावचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी केली होती. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २४ मार्च रोजी कंपनीमध्ये जाऊन पाहणी केली होती. पाहणीमध्ये कंपनीकडून अनेक पर्यावरण कायद्यांचा भंग केला असल्याचे समोर आले होते.
याबाबत मंडळाने कायद्याचे पालन करुन त्या अनुषंगाने बदल करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कंपनीकडून पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक कायद्यांचे पालन केले गेले नाही. या प्रकरणी मंडळाने कंपनीला अंतरिम आदेश काढला होता. मात्र, त्यानंतरही कंपनीने कोणत्याही उपाययोजना न करता मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे अखेर एमपीसीबी ने १४ जुलैला कारवाईचा बडगा उगारून कंपनीचे उत्पादन ४८ तासांत बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारचे काम सुरू न करण्याचे आदेशात नमुद केले आहे.
वीज व पाणी तोडण्याचेही आदेश
महामंडळाचे पुणे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कंपनीचे उत्पादन ४८ तासांत बंद करण्यासोबत कंपनीला होणारा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठाही तोडण्यात यावा. महावितरणच्या केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच सणसवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी यांना वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे निर्देश आदेशात दिले आहेत."
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.