झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून हाणामारी
सीविक मिरर ब्यूरो
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या (एसआरए) कामाला अडथळा करतो आणि सही देत नाही, या कारणावरून २० ते २५ जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी १५ जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (२० एप्रिल) रात्री सव्वाअकरा ते शुक्रवारी (२१ एप्रिल) मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपरीमधील यशवंतनगर आणि वायसीएम हॉस्पिटल येथे हा सर्व प्रकार घडला आहे.
शंकर संभा चौधरी, गौरव शंकर चौधरी, प्रदीप बंकट शिंदे, स्वप्नील महावीर गायकवाड, परमेश्वर चौधरी, अविनाश चौधरी, गौरव चौधरी, प्रदीप शिंदे, पाच महिला आणि इतर सात ते आठजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेचा भाचा साहिल आणि पती नवनाथ यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून सुरुवातीला टोळक्याने शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मात्र, हा वाद जुन्या भांडणाचा नसून, एसआरए स्कीम अंतर्गत बांधकाम करताना ना हरकत प्रमाणपत्रावर तक्रारदार सही करीत नसल्यामुळे घडल्याचे समोर आले. मारहाण करणाऱ्यांनी साहिल याच्या डोक्यात कोयता मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिथे जाऊन काही महिलांनी आणि पुरुषांनी तक्रारदार महिलेला देखील मारहाण केली. तक्रारदार महिलेच्या पतीला उद्देशून या लोकांनी ‘तू आमच्या एसआरएच्या कामाला अडथळा करतो, सही का देत नाही’ असे म्हणून शिवीगाळ करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.