दावे-प्रतिदावे, कार्यालय जगतापांच्या नावे!
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी खरेदी केलेल्या आणि आजही त्यांचीच मालकी असलेल्या कार्यालयात मंगळवारी (दि. ४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडानंतर ही शेवटची संयुक्त बैठक ठरण्याची शक्यता आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी मॉडेल सिटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे २००३ मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वत:चे हक्काचे पक्ष कार्यालय नव्हते. त्यामुळे आमदार जगताप यांनी त्यांचे बंधू विजय जगताप यांच्या नावावर खराळवाडी येथे कार्यालय खरेदी केले. गेल्या २० वर्षांपासून या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार चालविला जात होता.
चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार जगताप हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, शहाराध्यक्ष, महापौर, विधान परिषदेला आणि कालांतराने विधानसभेला बंडखोरी करून अपक्ष आमदार म्हणून सलग दोन वेळा निवडून आले होते. नंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणूक लढविली होती. २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी २०१४ आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक जिंकली. ३ जानेवारी २०२३ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत.
जगताप यांच्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना पक्षासाठी स्वखर्चाने कार्यालय खरेदी केले होते. विशेष म्हणजे, गेल्या २० वर्षात आमदार जगताप यांनी पक्ष सोडला तरी या कार्यालयावर कधीही आपला हक्क सांगितला नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील कधीही कार्यालयाची जागा स्वमालकीची असल्याचे दाखवून दिले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार आणि अन्य नेत्यांनी फारकत घेत दोन दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विचारांसोबत म्हणजेच शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या बैठकीत काही जुन्या पदाधिकाऱ्यांचा हाच सूर होता. तर गेल्या १५-२० वर्षात विविध पदे भूषविलेल्या बहुतांश नेत्यांनी-पदाधिकाऱ्यांनी आपण सत्तेत राहून नागरिकांच्या कामांना चालना देण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत राहण्याबाबत निश्चित केले. मात्र, शहराध्यक्ष अजित गव्हाणे गेल्या दोन दिवसांपासून मौन बाळगून आहेत. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला, हे समजू शकले नाही.
माजी आमदार विलास लांडे यांनी यापूर्वीच आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे लांडे यांचे नातेवाईक असून, त्यांचा कल कोणत्या पवारांकडे आहे, हे समजू शकलेले नाही. दरम्यान, मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वांनी एक राहून काय तो निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले होते. सकाळी झालेल्या या बैठकीनंतर ठराविक पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर स्वतंत्र बैठक घेतली. यात जो निर्णय होईल, तो सर्वांना कळविण्याचेही ठरले होते. मात्र, बैठकीत काय निर्णय झाला ते रात्री उशिरापर्यंत कोणालाही कळविण्यात आलेले नव्हते.
राज्यात दोन स्वतंत्र गट तयार झालेले असतानाच पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच जगताप यांनी खरेदी केलेल्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीची मंगळवारी सकाळची बैठक ही शेवटची संयुक्त बैठक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढील बैठकांमध्ये शरद पवार यांचा गट किंवा अजित पवार यांच्या गटापैकी एकच गट या कार्यालयातून पक्षाचे कामकाज चालविणार आहे. शहराध्यक्ष गव्हाणे यांची या विषयावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.