येरवडा कारागृहातील कैद्यांची सिनेस्टाइल हाणामारी

येरवडा कारागृहातील कैद्यांच्या हाणामारीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात दोन न्यायालयीन कैदी जखमी झाले आहेत. हरिराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वगराळे यांच्या साहाय्याने या दोघांना बेदम मारहाण केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:08 am
येरवडा कारागृहातील कैद्यांची सिनेस्टाइल हाणामारी

येरवडा कारागृहातील कैद्यांची सिनेस्टाइल हाणामारी

कच्चे आणि पक्के कैदी एकमेकांत भिडले, प्लास्टिक बकेट, वगराळ्याने केली मारहाण; दोन कैदी जखमी; सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

येरवडा कारागृहातील कैद्यांच्या हाणामारीच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत.  कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात दोन न्यायालयीन कैदी जखमी झाले आहेत. हरिराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वगराळे यांच्या साहाय्याने या दोघांना बेदम मारहाण केली. येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बराक क्रमांक दोनच्या जवळील हौदाजवळ ३१ मार्च रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 

या हाणामारीप्रकरणी कारागृह शिपाई यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एकनाथ गांधले असं या शिपायाचं नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, ओंकार नारायण गाडेकर, मंगेश शकील सय्यद  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील वर्षी आळंदीत दोन गटात भांडण झाले होते. या भांडणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर आणि इतरांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना येरवडा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. या विभागात बाकी कैदीदेखील आहेत. हरिराम पांचाळ आणि मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपींचे भांडण झाले होते.

या भांडणाचा राग मनात धरून अर्जुन वाघमोडे आणि इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वगराळे याच्या साहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार शिपायांना कळताच त्यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैदी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरू  असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तरंग राकेश परदेशी, नीलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story