चिखली पोलीस ठाणे लवकरच नवीन जागेत
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
चिखलीत घरकुल परिसरातील १५ गुंठे जागा चिखली पोलीस ठाण्यासाठी देण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या जुन्या आरटीओ इमारतीत असणारे चिखली पोलीस ठाणे लवकरच प्रशस्त अशा नवीन जागेत स्थलांतरित होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पात एकूण १५८ इमारती असून, १५३ इमातींमधील लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती.
वास्तविक, निगडी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चिखली पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. सध्या चिखली पोलीस ठाणे जुन्या आरटीओ इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याकरिता सेक्टर क्रमांक १७, स्पाईन रोडलगत, घरकुल गेटसमोर महापालिकेच्या ताब्यात असलेली २० गुंठे मोकळी जागा मिळावी, अशी मागणी होत होती. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या होत्या. त्यानुसार सेक्टर क्रमांक १७ व १९ येथील प्रकल्पामधील एकूण १५ गुंठे जागा पोलीस स्टेशनच्या उभारणीकरता उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामुळे चिखली पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळाली आहे. ही जागा लवकरच पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित होईल, असे पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने कळवले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.