चिकन-मटणाच्या... मापात पाप!

आरोग्याला हितकारक आणि भरपूर प्रथिने असलेल्या मांसाहाराला नागरिक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. त्याचे शरीराला अनेक फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकही चिकन-मटण घेण्यासाठी दुकानात गर्दी करत असल्याचे पाहावयास मिळते. परंतु, अनेक चिकन-मटण दुकानदार ग्राहकांना वजनामध्ये फसवत असल्याचे उघडकीस आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:00 am
चिकन-मटणाच्या... मापात पाप!

चिकन-मटणाच्या... मापात पाप!

वजन करताना दुकानदारांकडून पुणेकरांची फसवणूक, एफडीआयच्या वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या कारवाईतून उघड

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आरोग्याला हितकारक आणि भरपूर प्रथिने असलेल्या मांसाहाराला नागरिक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. त्याचे शरीराला अनेक फायदे असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नागरिकही चिकन-मटण घेण्यासाठी दुकानात गर्दी करत असल्याचे पाहावयास मिळते. परंतु, अनेक चिकन-मटण दुकानदार ग्राहकांना वजनामध्ये फसवत असल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ६१९ दुकानदारांनी मापात पाप केल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि संरक्षण विभागातील वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या कारवाईत नुकतीच पुढे आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०४ चिकन आणि मटण दुकानांतील वजनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६० चिकन आणि मटण दुकानदार वजनात ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुणे शहरातील २९ चिकन, मटण दुकानांची तपासणी केली असता त्यातील १६ दुकानदार फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. ९ मार्चला वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील एकूण ६१९ व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३२ लाख ६० हजार ७०० रुपयांचा दंड आकारला. त्यामुळे चिकन-मटण खरेदी करताना ग्राहकांनी दुकानदारांकडून फसवणूक तर होत नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे.

तंदुरुस्त आरोग्यासाठी अनेकजण जिम करतात. जिम केल्यानंतर जास्त प्रोटिन मिळण्यासाठी मांस खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय सर्व स्तरातील नागरिक शरीराला पुरेसे प्रोटिन मिळावे म्हणून चिकन, मटण खरेदी करत असतात. परंतु ज्या दुकानातून खरेदी केली जाते ते मापात फसवणूक करतात आणि ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही कमी प्रमाणात चिकन, मटण ग्राहकाला दिले जाते. बहुतेक वेळा दुकानदार नेहमीचा असल्याने ग्राहकाकडून याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अनेक चिकन, मटणच्या दुकानदारांकडून ग्राहकांची वजनात फसवणूक केली जात आहे. वैध मापनशास्त्र यंत्रणेकडून चिकन, मटन विक्रेत्यांसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्यात तपासणी केलेल्या चिकन-मटन दुकानदारांपैकी ६० दुकानदार फसवणूक करत असल्याचे या तपासात उघडकीस आले आहे.

चिकन-मटण दुकानदारांकडे इलेक्ट्रिकल आणि लोखंडी असे दोन प्रकारचे माप असतात. त्यातील लोखंडी मापाचे प्रमाण ठरवून त्याच्या खालच्या बाजूस सील लावले जाते. मात्र काही दुकानदारांकडून हे सील तोडून मापात बदल केला जातो. इलेक्ट्रिकल वजन काट्यात ग्राहकाचे लक्ष नसताना हातचलाखी करून फसवणूक करण्यात येते. किंवा त्याची सेटिंग बदलून मापात फेरफार केला जातो. यात ग्राहकांनी मोजलेल्या रकमेच्या तुलनेत त्यांना कमी प्रमाणावर मांस दिले जाते.  यातील लोखंडी माप दर दोन वर्षाने आणि इलेक्ट्रिकल माप प्रत्येक वर्षी वैध मापनशास्त्र यंत्रणेकडून तपासून घ्यावे असा नियम आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून अनेक दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत आहेत. ज्या दुकानदारांनी वजनकाट्यांची फेरपडताळणी केलेली नाही तसेच मुद्रांक शुल्क भरलेले नाही, अशांवर कारवाई करण्यात आली आहे.

वैध मापनशास्त्र ही वजन मापविषयक अधिनियम आणि नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. यंत्रणेचे विभागप्रमुख हे वैध मापनशास्त्र नियंत्रक आहेत. या विभागांतर्गत असणार्‍या निरीक्षक विभागाच्या कार्यालयाकडून व्यापाऱ्यांकडील असलेल्या वजनमापांची पडताळणी केली जाते. त्यावर मुद्रांकन केले जाते. वजन मापविषयक कायद्यातील तरतुदी ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षणार्थ कायदा आणि नियमांच्या अंमलबजावणीचे काम पाहिले जाते. त्यांच्याकडून आवेष्टित वस्तूंवर नियमानुसार घोषवाक्ये नसल्यास, मूळ छापील किमतीत खाडाखोड केल्यास, छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विक्री केल्यास, गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे वजन काटा उपलब्ध नसल्यास कारवाई केली जाते. ग्राहकांना विविध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांनी नियंत्रक कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच  ९८६९६९१६६६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन वैध मापनशास्त्र उपनियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story