पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
पुणे सायबर चोरट्यांनी कहरच केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी थेट पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख यांचा फोटो वापरून “माही वर्मा” या नावाने हे बनावट अकाऊंट तयार करण्यात आले आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या अकाउंटवर आपण आयएएस अधिकारी असल्याचे म्हटले आहे. तसचे आपण मुंबईत राहत असल्याचेही त्यात म्हटले आहे. याशिवाय, या बनावट अकाऊटवरून काही लोकांना रिक्वेस्ट देखील पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रकारानंतर राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी २ वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे. यामुळे ही माही वर्मा नाव वापरणारी किंवा वापरणारा ठग कोण आहे? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवर कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी पुन्हा केले आहे.