पुण्यात २८ एप्रिलपर्यंत हलक्या पावसाची शक्यता
पुणे शहरात २८ एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल, तर तापमान ३६ अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील आर्द्रता आणि विदर्भ तसेच दक्षिण तामिळनाडू दरम्यान कमी दाबाच्या प्रणालीमुळे शहराच्या हवामानावर परिणाम झाला आहे. रविवारी शिवाजीनगर आणि लोहेगाव येथे अनुक्रमे ३६.१ अंश सेल्सिअस आणि ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
मात्र, २८ एप्रिलपर्यंत शहरातील काही भागात हलका पाऊस पडेल आणि तापमान सामान्य मर्यादेपेक्षा कमी राहील. याचबरोबर बदलत्या हवामानाच्या स्थितीमुळे चंद्रपूरसह विदर्भातील तापमान सामान्यपेक्षा कमी राहील.