सेलेब्रिटी उमेदवार बिचुकले अडकले केवळ ४७ मतांवर

विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवणारे आणि राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी मिळावी, यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिणारे अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत अवघी ४७ मते मिळाली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:07 am
सेलेब्रिटी उमेदवार बिचुकले अडकले केवळ ४७ मतांवर

सेलेब्रिटी उमेदवार बिचुकले अडकले केवळ ४७ मतांवर

गेमचेंजर ठरण्याचा दावा पुन्हा एकदा ठरला फूस्स

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवणारे आणि राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी मिळावी, यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिणारे अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत अवघी ४७ मते मिळाली आहेत.

एखादी चर्चेतील निवडणूक असल्यास बिचुकले हमखास निवडणुकीत उतरतात. त्यामुळे मूळचे साताऱ्याचे असूनही ते कसब्याच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र मतांची पन्नाशीही त्यांना गाठता आली नाही.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. गेली काही वर्षे निवडणुकीच्या आखाड्यात उतरताना दिसत आहेत. विशेषतः २००४ पासून ते विविध निवडणुकांमध्ये नशीब आजमावत आहेत. त्यात नगरपालिका ते राष्ट्रपतिपदापर्यंतच्या निवडणुकांचा समावेश आहे. सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात एका छोट्याशा घरात बिचुकले राहतात. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना कोणत्याच निवडणुकीत यश मिळालेले नाही.

निवडणुका आल्या की बिचुकले विचित्र विधाने करताना दिसतात. त्यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी ४८ जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर विधानसभेच्या २८८ जागाही लढवू, असे बॅनर साताऱ्यात लावले होते. बिचुकले यांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी २०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, असेही बॅनर झळकवले होते. उदयनराजे भोसले २००९ साली पहिल्यांदा खासदार झाले. त्यावेळी बिचुकले यांनी त्यांच्या विरोधातही याचिका दाखल केली होती. बिचुकले यांनी यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना १३७ मते मिळाली होती.

कसबा विधानसभा निवडणुकीसाठी बिचुकले यांना कपाट चिन्ह मिळाले होते. त्यांनी घरोघरी जाऊन त्याचा प्रचार केला. पाणी, रस्ते या मूलभूत प्रश्नांवर काम करणार असल्याचे ते मतदारांना सांगत होते. मात्र, मतदारांनी कपाटाला चावी दिलीच नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story