CCTV off, 'program' on : सीसीटीव्ही बंद, ‘कार्यक्रम’ सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली करसंकलन कार्यालयात ओली पार्टी साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्मार्टसिटी ‘सर्व्हर रूम’ मधील केबल काढून फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 26 Jul 2023
  • 12:11 pm
सीसीटीव्ही बंद, ‘कार्यक्रम’ सुरू

सीसीटीव्ही बंद, ‘कार्यक्रम’ सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ओव्हर स्मार्ट कारभार पार्टी कळू नये यासाठी स्मार्ट सिटी ‘सर्व्हर रूम’मधील केबल कर्मचाऱ्याने काढून फेकली, चिखली परिसरातील सिग्नल आणि सीसीटीव्ही बंद

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली करसंकलन कार्यालयात ओली पार्टी साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्मार्टसिटी ‘सर्व्हर रूम’ मधील केबल काढून फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या या ओव्हर स्मार्ट कारभारामुळे चिखली परिसरासह आसपासच्या परिसरातील काही भागातील स्मार्ट सिग्नल यंत्रणा ठप्प होऊन सीसीटीव्हीदेखील बंद झाले होते. हा प्रकार वारंवार होऊ लागल्याने स्मार्ट सिटी विभागाकडून सीसीटीव्ही सर्व्हरची पाहणी करण्यात आली. यावेळी चिखलीतील कंत्राटी सुरक्षारक्षकाने सर्व्हरची केबल काढून टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना याची माहिती देताच संबंधित कंत्राटी सुरक्षारक्षकावर फौजदारी कारवाई करण्यासाठी महापालिकेने पोलिसांना पत्र दिले आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणांसाठी महापालिका करसंकलनाच्या १७ विभागीय कार्यालयात सर्व्हर रूम तयार करण्यात आलेली आहे. त्या सर्व्हर रूमला प्रत्येक चौकाचौकातील स्मार्ट सिग्नल, सीसीटीव्ही केबल जोडण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व्हरहून सिग्नल यंत्रणा चालविली जाते, तर सीसीटीव्ही डेटा सेव्ह केला जातो. मात्र, चिखली परिसरात स्मार्ट सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही सेवेत वारंवार बिघाड होत होता. ही यंत्रणा नेमकी कशामुळे बंद होते, याचा शोध स्मार्ट सिटी विभागाला लागत नव्हता. कोणताच टेक्निकल एरर नसल्याने सर्व्हर रूमच्या बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही तपासण्यास स्मार्ट सिटीच्या मेन सर्व्हरकडून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी चिखली कार्यालयातील सर्व्हरच्या केबल काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले.

चिखली करसंकलन कार्यालयात प्रशासन अधिकारी, तत्कालीन सहायक मंडलाधिकारी, सर्व लिपिक, सुरक्षारक्षक यांच्या उपस्थितीत नुकतीच आखाड ओली पार्टी साजरी केली होती. त्यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी आखाड पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळीदेखील सुरक्षारक्षकांनी सर्व्हर रूममधील केबल काढून टाकली होती.

सदरील सर्व्हर रूममधील केबल काढून टाकण्यास वरिष्ठ अधिकारी सांगत असल्यानेच हे कृत्य सुरक्षारक्षकाने केल्याची चर्चा कार्यालयात सुरू आहे. केबल काढून टाकल्याने सीसीटीव्ही बंद होतात, पण ते बंद करतानाचे चित्रीकरण अन्य एका कॅमेऱ्यात होते याची कल्पना सुरक्षारक्षकांना नव्हती. परंतु, करसंकलन प्रशासन अधिकारी, सहायक मंडलधिकारी, लिपिक यांना सर्व्हर रूमची संपूर्ण माहिती असूनही सर्व्हर रूममधील केबल काढून सीसीटीव्ही यंत्रणा वारंवार बंद केल्या जात होत्या. त्यानंतरच आखाड पार्ट्यासह कित्येक पार्ट्या करसंकलन कार्यालयात दुपारीच साजऱ्या करण्यात आल्या. पोलिसांनी याबाबत कारवाई सुरू केल्यानंतर त्या पार्ट्यांना कोण-कोण उपस्थित होते आणि यामध्ये प्रशासन अधिकारी, सहायक मंडलाधिकारी यांच्यासह लिपिकांचाही सक्रिय सहभाग आहे की नाही, हे उघड होणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळेच फुटले बिंग

चिखली कार्यालयात कंत्राटी सुरक्षारक्षकाने सर्व्हर रूममध्ये रात्री प्रवेश करून सर्व्हरची केबल काढून फेकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. तसेच ठराविक कालावधीनंतर पुन्हा या केबल जोडल्या जात होत्या. त्यामुळे संतापलेल्या स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे संचालक शेखरसिंह यांना पाठविले. आयुक्तांनी फुटेज पाहताच तत्काळ करसंकलन सहायक आयुक्तांना बोलावून घेत सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, चिखली करसंकलनचे सहायक मंडलाधिकारी राजेंद्र कुंभार यांनी चिखली पोलीस स्टेशनला कंत्राटी सुरक्षारक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच यापुढे सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत सर्व्हर रूममध्ये प्रवेश करू नये, अन्यथा संबंधित अधिकारी, कर्मचा-यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पालिका कर्मचाऱ्यांकडूनच सुरक्षेची ऐशीतैशी

कुदळवाडी-चिखली परिसर संवेदनशील मानला जातो.  त्यामुळे सातत्याने या परिसराची तपासणी, धाडसत्र स्थानिक पोलीस, गुप्तचर आणि तपास यंत्रणांकडून हाती घेतली जात असते. देहूरोड पोलीस ठाण्याला जोडून असलेला परिसर १० वर्षांपूर्वी याच कारणासाठी निगडी पोलीस ठाण्याला जोडण्यात आला होता. शहर पोलिसांकडील अधिकचे मनुष्यबळ आणि सीसीटीव्ही यंत्रणांसाठी हा निर्णय झाला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आयुक्तालय झाल्यावर चिखली हे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले, पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच अशाप्रकारे सुरक्षेची पायमल्ली होत असेल तर नागरिकांसाठी त्यांच्याच पैशांतून लावलेल्या सीसीटीव्हीचा उपयोग काय, असा गंभीर सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story