पीएमपीतील सीसीटीव्ही शोभेपुरते

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) चालक बस चालवताना समोर मोबाईल ठेवून चित्रपट पाहात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकला असता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 11:17 am
पीएमपीतील सीसीटीव्ही शोभेपुरते

पीएमपीतील सीसीटीव्ही शोभेपुरते

एकात्मिक वाहतूक निरीक्षण यंत्रणेचे कक्ष बिनकामाचे; तक्रार आल्यावरच फुटेजची तपासणी

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) चालक बस चालवताना समोर मोबाईल ठेवून चित्रपट पाहात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकला असता. अनेक चालक कानाला हेडफोन लावून, मोबाईलवर बोलत बस चालवत असल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे. त्यावर पीएमपी प्रशासनाला अजूनही अंकुश ठेवता आला नसल्याचे रविवारच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. अनेक बसमध्ये सीसीटीव्ही असूनही असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून त्याचा वापरच केला जात नसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमपीच्या ताफ्यात जवळपास २२०० बस असून त्यापैकी सुमारे १७५० बस मार्गावर असतात. यातील सुमारे ४०० बस इलेक्ट्रिक असून सीएनजीवरील ५० बस 'पुण्यदशम' सेवेसाठी वापरल्या जातात. या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही असून सर्व सुस्थितीत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. बसमध्ये घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच महिला सुरक्षा, चालक व वाहकांची प्रवाशांसोबतची वर्तणूक, बसमधील गर्दी पाहून संबंधित मार्गावर जादा बस सोडण्याची यंत्रणाही या माध्यमातून कार्यान्वित केली जाऊ शकते, पण सध्या या सीसीटीव्हीचा वापरच केला जात नाही.

रविवारी निगडी डेपोमधील एक चालक बस चालवताना मोबाईल पाहात असल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ही बस ठेकेदाराकडील इलेक्ट्रिक बस होती. तर चालकही ठेकेदाराकडील होता. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून तातडीने संबंधित चालकावर कारवाई करत त्याला सेवेतून काढण्यात आले. एका प्रवाशाच्या सतर्कतेने चालकाचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर प्रशासनाला ही कारवाई करता आली. पण प्रशासनाकडे इतरवेळीही प्रवाशांकडून चालकांबाबत अनेक तक्रारी केल्या जातात. या तक्रारींवर पुराव्याअभावी कारवाई होत नाही. तर काही वेळा किरकोळ दंडात्मक कारवाई किंवा समज दिली जाते.

चालकांकडून घडत असलेल्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करणे अपेक्षित आहे. मागील अनेक वर्षांपासून याबाबत सातत्याने केवळ चर्चा केली जाते. सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी अनेकदा झाली आहे. निधीअभावी पीएमपी हे करणे शक्य नाही. असे असले तरी सीसीटीव्ही बसवूनही ते त्याचवेळी पाहता येईल, अशी यंत्रणा अस्तित्वात नाही. एकात्मिक वाहतूक निरीक्षण यंत्रणेसाठी (आयटीएमएस) पीएमपीने नियंत्रण कक्ष उभारला आहे. हा कक्ष आता केवळ तक्रार निवारण कक्ष बनला आहे. त्यामध्ये कसलाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत नाही. सध्या सर्व इलेक्ट्रिक बसमध्ये सीसीटीव्ही आहेत. ते सीसीटीव्ही पाहण्यासाठी कोणत्याही आगारात यंत्रणा नाही. किती सीसीटीव्ही सुरू आहेत, याबाबत प्रशासनाकडे ठोस माहिती नाही.

एखादी घटना घडल्यानंतर किंवा त्याबाबत तक्रार आल्यानंतरच सीसीटीव्ही पाहिले जातात. मागील काही महिन्यांत क्वचितच असा प्रसंग घडल्याचे पीएमपीतील अधिकारीच सांगत आहेत. विविध मार्गांवरील विशेषत: गर्दीच्या मार्गावरील, ग्रामीण भागातील, रात्रीच्या वेळी असलेल्या बसमधील सीसीटीव्ही पाहता यायला हवेत. त्यातून सद्यस्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो. तसेच चोऱ्यांसह चालक व वाहकांवरही नजर राहू शकते, अशी अपेक्षा एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. रविवारच्या घटनेवर पीएमपी प्रवासी मंचचे सचिव संजय शितोळे म्हणाले, ‘पीएमपीचे चालक प्रगतिपथावर आहेत? प्रशासकीय व्यवस्थेने वेळीच याला आवर घालायला हवा. मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांची माहिती आरटीओला कळवून मोटर वाहन कायद्याप्रमाणे आधीच कारवाईची मागणी केली असती तर नक्कीच ही वेळ आली नसती. यास 

प्रशासकीय व्यवस्था जबाबदार आहे.’ तर प्रवासी अरुण सोनवणे यांनी बसमधील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू आहे किंवा नाही, त्यातील फुटेज रोज तपासले जाते की नाही, असे प्रश्न उपस्थित करून याबाबतीत प्रशासन निराशाजनक असल्याचे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story